News Flash

“…तर पुढचे परिणाम अतिशय गंभीर असतील”, देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारला इशारा

"जनतेने तरी किती यातना सहन करायच्या. त्यांना समस्यांना वाचा फोडणार कोण?"

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस. (संग्रहित छायाचित्र)

करोनाशी लढा देताना उपाययोजना करण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याची टीका करीत भाजपाकडून आज राज्यभरात ‘माझे अंगण, माझे रणांगण‘ आंदोलना करण्यात आलं. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे हे आंदोलन केवळ सरकारला जागे करण्यासाठी आहे. रूग्णसंख्या 40 हजारावर गेली असताना आरोग्यसेवेकडे अजूनही सरकारने गांभीर्याने पाहिले नाही, तर पुढचे परिणाम अतिशय गंभीर असतील, असा इशारा दिला आहे.

“देशातील सर्वाधिक रूग्ण आणि देशातील सर्वाधिक कोरोना मृत्यू हे महाराष्ट्रात असून, राज्यातील आरोग्य यंत्रणा पुरती कोडमडली आहे. देशात आणि इतरही अनेक राज्य प्रत्येक घटकासाठी पॅकेज देत असताना महाराष्ट्रात मात्र कोणतेही पॅकेज जाहीर झालेले नाही. एवढेच काय, केंद्राकडून जो निधी येतो आहे, तोही खर्च केला जात नाही,” असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

“राज्य सरकारसोबत सातत्याने सहकार्याचीच भूमिका भाजपाने घेतली आहे आणि ती यापुढेही राहील. पण, जनतेने तरी किती यातना सहन करायच्या. त्यांना समस्यांना वाचा फोडणार कोण? आज प्रत्येक घटक संकटात आहे. राज्यात शेतमाल खरेदी पूर्णत: थांबली आहे. शेतमाल घरातच पडून आहे. खरीपाचा हंगाम तोंडावर असताना त्याची अवस्था वाईट आहे. केंद्र सरकारने पैसे दिले तरी खरेदी नीट होत नाही. त्यामुळे राज्य सरकारने शेतकर्‍यांना तत्काळ मदत दिली पाहिजे. हातावर ज्यांचे पोट आहे, असे असंघटित कामगार, रिक्षाचालक, टॅक्सीचालक, मजूर, बारा बलुतेदार अशा सर्व गरिबांसाठी तत्काळ पॅकेज देण्याची गरज आहे,” अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.

“केंद्र सरकारने 20 लाख कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर केले. मध्यप्रदेश, कर्नाटक, छत्तीसगढ, गुजरात अशा देशातील इतर राज्यांनी सुद्धा पॅकेज जाहीर केले. अशात महाराष्ट्रासारखे मोठे राज्य एकाही घटकासाठी एकही पॅकेज जाहीर करू शकत नाही, ही बाब वेदनादायी आहे. केंद्र सरकारने धान्य दिले. पण, त्याचेही गरजूंपर्यंत वितरण नाही. ना कोणत्या घटकाला मदत, ना कोरोनाग्रस्त रूग्णांची काळजी. राज्यात मृतदेहांशेजारी उपचार आणि एका खाटेवर दोन रूग्ण, अशी स्थिती निर्माण झाली आहे. कोविड योद्ध्यांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नाही. कोरोनाव्यतिरिक्त अन्य रूग्णांवरील उपचारांची स्थिती सुद्धा अतिशय वाईट आहे. केवळ रूग्णवाहिका नाही, म्हणून अनेकांचे मृत्यू होत आहेत. आमचे पोलिस बांधव तर प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असताना त्यातील सुमारे 1600 वर पोलिसांना लागण झाली आहे. काही पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यांच्या उपचारांची कोणतीही काळजी घेतली जात नाही,” असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 6:35 pm

Web Title: coronavirus lockdown bjp devendra fadanvis on mahavikas aghadi shivsena uddhav thackeray sgy 87 2
Next Stories
1 नितेश राणे यांची आदित्य ठाकरेंवर टीका
2 मुंबईत जून मध्यानंतर करोना रुग्ण संख्येचा आलेख घसरणार?
3 “पोलिसांची पिळवणूक, पत्रकारांचा छळ, साधूंची हत्या, गरीबांचे पैसे लाटणे बंद करा”
Just Now!
X