मुंबईतून मृतदेहासोबत प्रवास करणाऱ्या तिघांना करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं आहे. ५६ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह घेऊन कुटुंबातील सहा जणांनी मुंबईतून कर्नाटकपर्यंत प्रवास केला. कर्नाटकमध्ये पोहोचल्यानंतर वैद्यकीय तपासणी केली असता सहापैकी तिघांना करोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं.

मुंबईत रिक्षाचालक असणाऱ्या या व्यक्तीचा ह्रदय बंद पडल्याने मृत्यू झाला होता. प्रशासनाची परवानगी घेतल्यानंतर कुटुंबातील सहा जण मृतदेह घेऊन कर्नाटकमधील आपल्या मूळ गावी प्रवासासाठी निघाले होते. अंत्यसंस्कार केल्यानंतर कर्नाटकमधील प्रशासनाने सर्वांची करोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी तिघांना करोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं. मृत व्यक्तीच्या पत्नीचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आला आहे.

कुटुंबाने रस्त्यात एका महिला आणि तिच्या मुलाला सोबत घेतलं होतं. या महिलेलाही करोनाची लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचा मुलगा जो एका खासगी बँकेत कामाला आहे त्याला सर्वात आधी करोनाची लागण झाली. प्रशासनाने सर्वांना क्वारंटाइन केलं आहे. दरम्यान स्थानिक प्रशासनाने यासाठी मुंबईमधील प्रशासनाला जबाबदार धरलं आहे.

“मुंबईतील प्रशासनाचा हा बेजबाबदारपणा आहे. कंटेनमेंट झोन असतानाही प्रशासनाने एकाच कुटुंबातील सहा जणांना मृतदेहासोबत प्रवास करण्याची परवानगी देण्याची गरज नव्हती,” असं पोलीस उपायुक्त वेंकटेश यांनी म्हटलं आहे.