लॉकडाउन जाहीर झाल्यापासून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचारी दिवस-रात्र डोळ्यात तेल घालून कर्तव्य पार पडत आहेत. पण करोनाशी लढणाऱ्या खाकी वर्दीतील अनेक योद्ध्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान दुर्दैवी बाब म्हणजे शनिवारी एकाच दिवशी मुंबईत चार पोलीस कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. बोरिवली. वाकोला आणि दिंडोशी या पोलीस ठाण्यांमध्ये हे कर्मचारी तैनात होते. मुंबईत आतापर्यंत २६ पोलीस कर्मचाऱ्यांनी करोनामुळे जीव गमवावा लागला आहे.

शुक्रवारी हाती आलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात मागील दोन दिवसात १२९ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे करोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या ३ हजार ३८८ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत राज्यात ४० पोलिसांचा करोनाची बाधा होऊन मृत्यू झाला आहे. तर ३ हजार ३८८ पैकी आत्तापर्यंत १९४५ पोलिसांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी यासंबंधी बोलताना सांगितलं की, “लॉकडाउन जाहीर होऊन तीन महिने होत आले आहेत. पहिल्या दिवसापासून सर्वात जास्त ताण पोलीस दलावर आहे. १८ तास सलग तर काही वेळा २० तास पोलीस अधिकारी आणि कर्मचारी फिल्डवर काम करत आहेत. मुंबईत संसर्ग वाढत असताना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची जबाबादारी पोलीस दलाव आहे. कुठे गर्दी झाली तरी आधी पोलिसांना बोलावलं जातं. गर्दीच्या ठिकाणी पोलीस पोहोचत असतात यामुळे त्यांचा जास्त लोकांशी संपर्क येतो. कर्तव्य बजावत असताना पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांशी संपर्क आल्यावर त्यांचं निधन होणं खूप वाईट बाब आहे”.

“५५ पेक्षा जास्त वय असणार्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्येच काम करण्यास सांगत आहोत. ज्यांना व्याधी आहेत अशा पोलीस कर्मचाऱ्यांनाही गर्दीत पाठवलं जाऊ नये अशा सूचना आहेत. पण आपल्याकडे गरज आहे त्यापेक्षा कमी पोलीस उपलब्ध आहेत. त्यांचे कामाचे तास कमी व्हावेत यासाठी आपण होम गार्डची मदत घेत आहोत. पोलिसांवरील ताण कमी कसा करता येईल यासाठी प्रयत्न सुरु आहे,” अशी माहितीही त्यांनी दिली आहे.