राज्यात करोना संकट वाढत असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील असं सांगत सूचक इशारा दिला आहे. तर दुसरीकडे आर्थिक राजधानी मुंबईत करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने आरोग्य प्रशासानची चिंता वाढली आहे. मुंबईत सोमवारी ४९३ नवीन रुग्णांची नोंद झाली तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला. करोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण ५ टक्के झाले आहे. त्यातच आता पुन्हा एकदा लॉकडाउनचं संकट घोंघावू लागलं आहे. सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या चेंबूरमधील एम-पश्चिम वॉर्डकडून सोसायटी आणि फेरीवाल्यांना करोना चाचणी करण्यात सांगण्यात आलं आहे. येथील सर्वाधिक रुग्ण उंच इमारतींमधील आहेत. इतकंच नाही तर पालिका अधिकाऱ्यांनी करोना रुग्णसंख्या नियंत्रित करण्यासाठी लॉकडाउन लागू केला जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हिंदुस्तान टाइम्सने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

एका आठवड्यापूर्वी या वॉर्डमध्ये दिवसाला १५ पेक्षा कमी रुग्ण आढळत होते. मात्र आता हे प्रमाण २५ वर गेलं आहे. दिवसाला रुग्णवाढीचा दर ०.२८ टक्क्यांवर पोहोचला असून पालिका अधिकारी यासाठी नागरिकांकडून सर्रासपणे होणारं नियमांचं उल्लंघन यासाठी जबाबदार असल्याचं सांगत आहेत. परिस्थितीची दखल घेऊन पालिकेने निवासी सदनिकांना नोटीस पाठवली असून करोनासंबंधित नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याची सूचना केली आहे.

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन?

नोटीसमध्ये सोसायटींना पाच मुख्य नियमांचं पालन करण्यास सांगण्यात आलं आहे – 
१) घरकाम करणाऱे, दूधवाला यांच्यासहित इमारतीत बाहेरील कोणत्याही व्यक्तीला परवानगी देऊन नका.
२) थर्मल स्क्रिनिंगसारख्या गोष्टींचं काटेकोरपणे पालन करा
३) जर करोना रुग्ण आढळला तर कुटुंबाने १४ दिवस अलगीकरणात राहण अनिवार्य
४) हाय-रिस्क असणाऱ्या कुटुंबातील इतर सदस्यांची करोना चाचणी करणं अनिवार्य
५) सोसायटीमध्ये लक्षणं असणाऱ्यांचीही चाचणी बंधनकारक

या नोटीसमध्ये महापालिका करोनासंबंधी जास्त प्रकरणं आढळणाऱ्या इमारती आणि सोसायटींना सील करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान पालिकेने वॉर्डमधील फेरीवाले आणि दुकानदारांची करोना चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. याआधीप्रमाणे जिथे करोना रुग्ण जास्त आहेत तिथे लक्ष केंद्रीत केलं जात आहे. यामुळेच खाऊ गल्लीमधील फेरीवाला, फळ विक्रेते यांची चाचणी केली जात असल्याचं पालिकेने सांगितलं आहे.