राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर कौटुंबिक हिंसाचारात वाढ झाली असल्याचं आपल्या वाचनात आलं असून त्याच मुद्द्यावर भाष्य करण्यासाठी आपण आलो असल्याचं त्यांनी सांगितलं. सुप्रिया सुळे यांनी यावेळी पुणे जिल्हा परिषदेने सुरु केलेल्या एका उपक्रमाची माहिती दिली. सोबतच कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी आपण काय करु शकतो यासंबंधी सल्ले, सूचना देण्याची विनंती केली. यावेळी त्यांनी फेसबुक युजर्सकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांचीही उत्तरं दिली.

यावेळी एका युजरने सुप्रिया सुळे यांनी फेसबुकमधून बाहेर या आणि फिल्डवर जा असं म्हटलं. त्यावर सुप्रिया सुळेंनी उत्तर देताना सांगितलं की, “फिल्डवर जाण्याची माझी खूप इच्छा आहे. मी नेहमी फिल्डवरच असते. आपण केलेलं काम हे उपलब्ध माहितीवरुन दिसंत फेसबुकवरुन नाही. सरकारने जे नियम, कायदे केले आहेत त्याप्रमाणे मला काम करावं लागतं. तुमची सूचना मला पडतीये. मलाही खूप इच्छा आहे”.

आणखी वाचा- “आपल्यावर छत्रपतींचे संस्कार आहेत हे विसरु नका”, कौटुंबिक हिंसाचार वाढल्याने सुप्रिया सुळे संतापल्या

“राज्य आणि केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांचं मी पालन करत आहे. नियम हे पाळण्यासाठी असतात, मोडण्यासाठी नाही. बाहेर जाण्याची परवानगी दिली जावी यासाठी मीदेखील अर्ज केला आहे, जेणेकरुन फिल्डवर काम करता येईल. ज्या गरजू लोकांना मदत लागते त्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून ती माहिती फेसबुकवरुन देत आहोत. काम करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणी मी ती पार पाडत आहे,” असंही यावेळी सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. इतकंच नाही तर सुप्रिया सुळे यांनी युजरला अजून काही सूचना असतील तर त्यादेखील द्या असंही सांगितलं.

सुप्रिया सुळे यांनी यावेळी कौटुंबिक हिंसाचारावर बोलताना सांगितलं की, “सध्या करोनामुळे सगळेच जण त्रस्त असून त्यांना चिंता सतावत आहे. भांडण हे नात्यातून वेगळं काढण्याची गरज आहे. एक तर शब्दाला शब्द वाढवून वाढवू शकता किंवा त्या वेळेला शांत बसून आपण तो क्षण जाऊ देऊ शकतो. ठाम राहणं, जाऊ देणं, आक्रमक होणं किंवा मग त्या क्षणी शांत राहून नंतर त्यावर मात करणे असे अनेक पर्याय आपल्याकडे आहेत”.

आणखी वाचा- “जनता विरोध करत असेल तर त्याला ट्रोलिंग समजू नका”, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला

“नोकरी, पैसा, घराचं भाडं, कर्जाचे हफ्ते यासंबंधी प्रत्येकाला चिंता सतावत आहे. त्यासंबंधीमार्ग काढण्यासाठीच आपण चर्चा करत असल्याचं यावेळी सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. जो डेटा समोर आला आहे त्यानुसार शहरी भागात याचं प्रमाण जास्त आहे. शहरात पती, पत्नी दोघंही काम करत असल्याने आर्थिक दबाब जास्त आहे. महिलांवर अत्याचार होत असून त्यांच्या भविष्याचाही गंभीर प्रश्न उपस्थित राहण्याची शक्यता असून त्यावर चर्चा केली पाहिजे. लॉकडाउनमुळे सोशल सपोर्ट सिस्टम कमी झाली आहे,” असं सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितलं.

“नवीन कायदे करण्याची ही वेळ नाही. घरगुती हिंसाचारावर आधीच कायदे आहेत. प्रकरण हाताबाहेर गेलं तर पोलीस ठाण्यात जाण्याशिवाय पर्याय नाही. पण समुपदेशन करणं हादेखील चांगला पर्याय आहे,” असं सुप्रिया सुळे यांनी यावेळी सुचवलें.