अनेक नशेबाजांची नशामुक्तीसाठी धडपड

मुंबई : करोना निर्मूलनासाठी देशभर सुरू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह प्रत्येक क्षेत्राला बसला असला तरी नशामुक्ती अभियानाला मात्र फायदेशीर ठरतो आहे. मद्य, तंबाखू, गुटखा, सिगारेटसह अमली पदार्थ मिळत नसल्याने व्याकू ळ झालेल्या अनेकांनी नशामुक्ती केंद्र, डॉक्टर, मानसोपचारतज्ज्ञांशी संपर्क साधून मुख्य प्रवाहात येण्याची इच्छा व्यक्त के ली आहे. त्यानुसार ते उपचार, समुपदेशनही घेत आहेत.

‘मुक्तांगण नशामुक्ती केंद्रा’च्या संचालक मुक्ता पुणतांबेकर यांच्या मते, मोठय़ा कालावधीसाठी अमली पदार्थ, तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ, सिगारेट, मद्य उपलब्ध न होणे हा नशामुक्ती अभियानातील महत्त्वाचा टप्पा आहे. टाळेबंदीमुळे तसा काळ उपलब्ध झाला आहे. या काळात नुकतीच सुरुवात के लेले, उंबरठय़ावर असलेल्या व्यक्ती सहज नशामुक्त होऊ शकतात. आहारी गेलेल्यांना अमली पदार्थ, तंबाखू किं वा तत्सम पदार्थ आणि मद्य न मिळाल्याने त्रास होऊ शकतो. मात्र पाच ते सहा टक्के व्यक्तींमध्येच भोवळ येणे, भास होणे असे गंभीर स्वरूपाचे ‘विथड्रॉव्हल सिम्टम्स’ आढळतात. उपचार, समुपदेशनाद्वारे या त्रासातूनही बाहेर पडणे शक्य आहे. मुक्तांगणमध्ये समुपदेशनासाठी संपर्क साधणाऱ्यांपैकी अनेकांनी टाळेबंदीच्या निमित्ताने नशामुक्त होण्याची इच्छा व्यक्त के ल्याचेही पुणतांबेकर सांगतात.

आहारी गेलेले किं वा अट्टल बनलेले स्वत:हून नशा सोडत नाहीत. त्यासाठी काही विशिष्ट परिस्थिती निर्माण व्हावी लागते. करोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे ती परिस्थिती निर्माण के ली आहे. अमली पदार्थापासून मद्य किं वा तंबाखूजन्य पदार्थ मिळेनासे झाल्याने त्रासलेल्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यांच्यापैकी अनेकांनी वैद्यकीय उपचार सुरू के ले आहेत. नशेचे प्रमाण आणि नशेचे साहित्य न मिळाल्यामुळे होणारा त्रास व्यक्तीनिहाय असतो. त्यामुळे नशामुक्ती अभियानात नशेचे साहित्य उपलब्ध न होणे, उपचार, समुपदेशनासोबत संबंधित व्यक्तीची इच्छा, आत्मविश्वास महत्त्वाचा मुद्दा आहे. टाळेबंदी हटल्यानंतर यातील किती व्यक्ती आपल्या निर्णयावर ठाम राहतात किं वा मोह आवरतात हे आत्ताच सांगणे कठीण आहे, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले.

देशभर टाळेबंदी लागू झाल्याने मुंबईपर्यंत अमली पदार्थ पोहचू शकत नाहीत. मुंबईतल्या विक्रेत्यांनी आधीपासूनच अमली पदार्थाचा साठा के ला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र हा साठा बाहेर काढणे किं वा ग्राहकांपर्यंत पोहोचवणे शक्य नाही. थोडक्यात, अमली पदार्थाची संघटित साखळी तुटली आहे. त्यामुळे सध्या अट्टल नशेबाजांपासून उंबरठय़ावर असलेल्या किं वा सुरुवात के लेल्यांना नशेच्या भोवऱ्यातून बाहेर काढणे शक्य आहे.

– शिवदीप लांडे, मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाचे प्रमुख