करोनाशी लढणाऱ्या मुंबई पोलीस दलातील आणखी एका योद्ध्याचा मृत्यू झाला आहे. कुर्ला पोलीस ठाण्यात वाहूतक शाखेत कार्यरत असणाऱ्या शिवाजी सोनावणे यांचा मृत्यू झाला आहे. मुंबई पोलिसांनी ट्विट करत शिवाजी सोनावणे यांच्या मृत्यूची माहिती दिली आहे. याआधी मुंबई पोलीस दलातील दोघांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. शिवाजी सोनावणे यांच्या निधनामुळे ही संख्या तीन झाली आहे.

शिवाजी सोनावणे यांना २० एप्रिल रोजी ताप आला होता. त्यांनी प्रथम खासगी डॉक्टरांकडून उपचार  घेतले. २१ एप्रिल रोजी राजावाडी घाटकोपर रुग्णालय येथे गेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना कस्तुरबा हॉस्पिटल येथे जाण्यास सांगितले. म्हणून त्यांच्या मुलाने त्यांना कस्तुरबा रुग्णालय येथे नेले. तेथील डॉक्टरांनी शिवाजी सोनावणे यांना रुग्णालयात दाखल करुन घेतले नाही व बेड शिल्लक नसल्याचे कारण सांगून नायर हॉस्पिटल येथे जाण्यास सांगितले. नायर हॉस्पिटलनेही त्यांना बेड उपलब्ध नसल्याचे कारण सांगून केईएम हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगितले. केईएम हॉस्पिटलमधील डॉक्टरांनीही सोनावणे यांना दाखल करुन घेण्यास व उपचार करण्यास नकार दिला व परत कस्तुरबा हॉस्पिटल येथे जाण्यास सांगितले.

अखेर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणदिवे यांनी मध्यस्थी केल्यानंतर शिवाजी सोनावणे यांना केईएम रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आलं होतं. त्यांना करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं होतं. अखेर सोमवारी त्यांचं निधन झालं.

करोनामुळे राज्य पोलीस दलातील पहिला बळी शुक्रवारी रात्री गेला होता. मुंबईच्या वाकोला पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले ५७ वर्षीय हवालदार नायर रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू पावले होते. त्यानंतर रविवारी आणखी एका हवालदाराचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.