शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपा राज्य सरकार बरखास्त करुन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी अशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. पण त्यांना यश मिळणार नाही असंही ते म्हणाले आहेत. करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात येत आहेत. लोकांचे प्राण वाचावेत, यासाठी ठाकरे सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री व भाजपा खासदार नारायण राणे यांनी सोमवारी राज्यपालांकडे केली.

नारायण राणे यांच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, “राणे कोण आहेत ? असा निर्णय घेण्याची मागणी करण्याचा कोणता अधिकार त्यांच्याकडे आहे ? राजभवनातून निमंत्रण आल्याने मी राज्यपालांना भेटायला गेलो होतो. चर्चेदरम्यान राज्यपालांनी राज्य सरकारला करोनाची स्थिती हाताळणं कठीण जात असल्याचा उल्लेख केला. पण मी त्यांना परिस्थिती नियंत्रणात असून मुख्यमंत्री सर्वात पुढे राहून लढा देत आहेत. प्रत्येक दिवशी महत्त्वाच्या उपाययोजना केल्या जात आहेत असं सांगितलं”.

नारायण राणे यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर बोलताना सांगितलं होतं की, “मी राज्यपालांना सर्व रुग्णालयं लष्कराकडे सोपवली पाहिजेत असं सांगितलं आहे. उद्धव ठाकरे लोकांचा जीव वाचवण्यात अपयशी ठरले आहेत. करोनाची स्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी मी राज्यपालांकडे केली आहे”.

महाविकास आघाडी सरकार करोनामुळे निर्माण झालेलं संकट हाताळण्यात अयशस्वी ठरलं असल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून केला जात आहे. याचदरम्यान राज्यातील अनेक नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शनिवारी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपा नेते नारायण राणेदेखील भेटीला पोहोचले होते. संजय राऊत आणि शरद पवार यांनी ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलेलं असून नारायण राणे यांनी मात्र सरकार करोना संकट रोखण्यात अपयशी ठरलं असून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

राज्यपाल – शरद पवार भेट
राज्यात दोन सत्ताकेंद्रे तयार होत असल्याची टिप्पणी करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यपालांच्या कार्यपद्धतीबद्दल तक्रोर करणारे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना राज्यपाल कोश्यारी यांनी भेटीसाठी निमंत्रित केले होते. त्यानुसार पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी राजभवनवर जाऊन राज्यपालांशी चर्चा केली. राष्ट्रपती राजवट लागू करण्याची राणे यांनी केलेली मागणी व राज्यपालांनी पवारांना भेटीसाठी बोलाविल्याने केंद्राच्या मनात काही वेगळे घोळत असल्याची चर्चा सुरू झाली. परंतु, ही केवळ सदिच्छा भेट होती, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. राज्याच्या प्रश्नांच्या संदर्भात चर्चा झाली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या पाठीशी भक्कम बहुमत आहे, याकडे पटेल यांनी लक्ष वेधले.