आंतरजिल्ह्याबाबत नीट नियोजन करुन, मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने अडकलेल्या लोकांची गावी जाण्याची व्यवस्था केली जाईल अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. आंतरजिल्हा एसटी सेवेचा निर्णय टप्प्याटप्प्याने घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे. अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

“जे परराज्यातील लोक आहेत त्यांना आपल्या राज्याच्या सीमेवर आणि परराज्यातून आपल्या सीमेवर आलेल्यांना तसंच आंतरजिल्ह्यात अडकलेल्यांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी मोफत एसटी सेवा देऊ असं आम्ही जाहीर केलं होतं. माहिती घेण्यास सुरुवात केली असता रेड झोनमधून बाकीच्या जिल्ह्यात माणसं पाठवू नका, तिथे करोना पसरवू नका अशा अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या. त्यामुळेच आम्ही आंतरजिल्ह्याचा निर्णय थांबवला,” असं अनिल परब यांनी यावेळी सांगितलं.

“मुंबईतून अन्य जिल्ह्यांमध्ये माणसं पाठवू नका अशा तक्रारी आमच्याकडे आल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही परवानगी मागितल्या होत्या. मुंबईतून करोना आपल्या गावी येईल अशा अफवा गावी पसरल्या आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनी विरोध केला,” अशी माहिती अनिल परब यांनी यावेळी दिला.

“जे लोक परराज्याच्या सीमेवर जाण्यास इच्छुक आहेत त्यांना अद्यापही मोफत सेवा सुरु आहे. एका दिवसात २५० ते २७५ बसेसने पाच हजार प्रवासी परराज्याच्या सीमेवर सोडले आणि तीन हजार प्रवासी परराज्यांच्या सीमेवरुन आपापल्या जिल्ह्यात सोडले,” अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे. “आंतरजिल्ह्याबाबत नीट नियोजन करुन, मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने अडकलेल्या लोकांची गावी जाण्याची व्यवस्था करु,” असं अनिल परब यांनी सांगितलं आहे.

“लोक अडकलेत याची आम्हाला देखील जाणीव आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नियोजनबद्ध निर्णय घेत आहोत. जे लोक रस्त्यावरुन चालत आहेत, त्यांना आधी मोकळं करुन, जिल्ह्यांबाबतचा निर्णय घेऊ,” असं अनिल परब यांनी सांगितलं. यावेळी लोकांना आवाहन करताना त्यांनी म्हटलं की, “एसटी डेपोमध्ये गर्दी करु नका, आपली काळजी आम्हाला आहे. लवकरात लवकर निर्णय घेऊ, कृपया स्टॅंडवर जाऊ नका. तिथे प्रक्रिया होणार नसून पोलीस स्टेशन किंवा तहसीलला प्रक्रिया पूर्ण करायची आहे”.