27 May 2020

News Flash

Coronavirus : पूर्ण टाळेबंदीचा पहिल्याच दिवशी फज्जा

बाजारपेठा उघडल्याने नागरिकांची नेहमीपेक्षा जास्त गर्दी

बाजारपेठा उघडल्याने नागरिकांची नेहमीपेक्षा जास्त गर्दी

मुंबई : करोनाबाबत अजिबात गंभीर नसलेल्या भांडुपच्या नागरिकांना आवरण्यासाठी येथे शनिवापर्यंत शंभर टक्के  टाळेबंदीचा पर्याय महापालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढे आणला. मात्र मंगळवारी पहिल्याच दिवशी या पूर्ण टाळेबंदीचा फज्जा उडाला. सकाळी येथील बहुतांश बाजारपेठा सुरू झाल्या आणि नागरिकांनी आठवडय़ाच्या खरेदीसाठी नेहमीपेक्षा जास्त गर्दी केली. अखेर पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांना सर्वत्र फिरून बाजारपेठा, दुकाने बंद करावी लागली.

करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र टाळेबंदी, जमावबंदी लागू करण्यात आली असली तरी भांडुपमध्ये या र्निबधांचा काहीही परिणाम दिसत नव्हता. येथील गाढव नाका, भट्टी पाडा या मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये सकाळ, संध्याकाळ खरेदीसाठी नेहमीप्रमाणे गर्दी होत होती. त्यातच खरेदीच्या निमित्ताने बाहेर पडणाऱ्या, विनाकारण भटकणाऱ्यांची त्यात भर पडू लागली. या गर्दीला आवर कसा घालावा याचा विचार सुरू असतानाच भांडुपमधील दाट लोकवस्ती असलेल्या वस्त्यांमधून करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली. करोनाचा विळखा घट्ट होऊ लागल्यानंतरही येथील नागरिकांमध्ये गांभीर्य नव्हते. अखेर एस विभाग कार्यालय, स्थानिक आमदार आणि नगरसेवकांनी संयुक्तपणे भांडुप पश्चिमेकडील भागात शनिवापर्यंत शंभर टक्के  टाळेबंदी राबवण्याचा निर्णय घेतला.

सोमवारी संध्याकाळी येथील वस्त्यावस्त्यांमध्ये शनिवापर्यंत भांडुपमध्ये पूर्ण टाळेबंदीबातच्या उदघोषणा केल्या गेल्या. मात्र मंगळवारी येथील प्रमुख बाजारपेठा सुरू झाल्या. ही माहिती मिळताच आठवडय़ाचे धान्य, भाजी आदी जीवनावश्यक वस्तू विकत घेण्यासाठी नागरिकांनी नेहमीपेक्षा जास्त गर्दी केली. हे समजताच पोलिसांनी गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने पोलिसांनी, पालिका अधिकाऱ्यांच्या मदतीने या बाजारपेठा, दुकाने बंद केली.

पालिका, पोलिसांनी सुरुवातीपासून नागरिकांना ढील दिल्याने ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप काही रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2020 2:12 am

Web Title: coronavirus lockdown violation in bhandup area zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 CoronaVirus : कस्तुरबामध्ये करोनाच्या चाचण्यांसाठी सुरक्षा कक्ष
2 CoronaVirus : समाजाची काळजी वाहणाऱ्यांना कुटुंबाची चिंता
3 धान्य पोहोचविण्यासाठी महापालिका सज्ज
Just Now!
X