करोना संकटात मुंबईला दिलासा देणारी एक माहिती समोर आली आहे. एकीकडे मुंबईत एका दिवसात सर्वाधिक नऊ हजाराच्या जवळ चाचण्या करण्यात आल्या असताना फक्त ७०० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. गेल्या १०० दिवसात आढळलेली ही सर्वाधिक कमी रुग्णसंख्या आहे. सोमवारी मुंबईत एकूण ८७७६ चाचण्या करण्यात आल्या होत्या. यामधील ७०० नमुने पॉझिटिव्ह आढळले.

रविवारी मुंबईत करोनाचे एकूण १०३३ रुग्ण आढलले होते. मुंबईचा डबलिंग रेट सध्या ६८ दिवसांवर आला असून रिकव्हरी रेट ७३ टक्क्यांवर आला आहे. तसंच २० जुलै ते २६ जुलै दरम्यान मुंबईतील करोना रुग्णवाढीचं प्रमाण १.३ टक्क्यांवर आलं आहे. सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रात एकूण ७९२४ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर २२७ जणांचा मृत्यू झाला. मुंबईत आतापर्यंत ६१३२ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील एकूण करोनाबाधितांची संख्या १ लाख १० हजार १२९ वर पोहोचली आहे. ७३ टक्के रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील ट्विट करत म्हटलं आहे की, “मुंबईत आतापर्यंतच्या सर्वाधिक (८७७६) चाचण्या करुनही फक्त ७०० रुग्ण सापडले आहेत. हे पूर्ण सक्षमतेने करण्यात आलेलं चेस द व्हायरस आहे. गेल्या तीन महिन्यात मिळालेला मोठा दिलासा”. आदित्य ठाकरे यांनी यावेळी मास्क अजिबात काढू नका अशी सूचनाही दिली आहे. मास्क नाही तर नंबर खाली आणायचे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

राज्यात नव्या रुग्णांपेक्षा करोनामुक्त अधिक

राज्यात सोमवारी आढळलेल्या नव्या रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण करोनामुक्त झाले. सोमवारी ७,९२४ नवे रुग्ण आढळले तर ८,७०६ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ३,८३,७२३ वर पोहोचली आहे. त्यातील २,२१,९४४ रुग्ण करोनामुक्त झाले असून, १,४७,५९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात सोमवारी २२७ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या १३,८८३ वर पोहोचली.