मुंबईमध्ये करोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. सोमवारी करोनाच्या १,२४७ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधितांचा आकडा ७६ हजारांच्या पुढे  गेला आहे. त्यातील ५७ टक्के  रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्याचबरोबर मुंबईत आतापर्यंत ४,४६१ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूदरही ५.८ टक्कय़ांवर गेला आहे. एकीकडे या आकडेवारीमुळे मुंबईकरांची अस्वस्थता वाढत असतानाच दुसरीकडे सोशल नेटवर्किंगवरुन अनेक अफवा पसरवल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे. अशीच एक पोस्ट मागील काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत असून यासंदर्भात आता थेट मुंबई महानगरपालिकेने स्पष्टीकरण दिलं आहे.

मागील काही आठवड्यांपासून सोशल नेटवर्किंगवर अनेक अफवा व्हायरल होत आहेत. मुंबई पोलिसांनी सोशल नेटवर्किंगवरुन खोटी आणि चुकीची माहिती शेअर करु नये असं अनेकदा आवाहन केलं असलं तरी या पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. मालाडमधील एका इमारतीमध्ये १६९ करोनाबाधित आढळून आल्याचा फोटो आणि मेसेज व्हायरल होत आहे. मालाडमधील अल्टा माँट इमारतीमध्ये एकाच वेळी १६९ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. या कॅप्शनसहीत पीपीई कीट घातलेले काही वैद्यकीय कर्मचारी इमारतीच्या गेटजवळ उभे असलेला फोटो मागील दोन ते तीन दिवसांपासून व्हायरल झाला आहे. आता मुंबई महानगपालिकेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन यासंदर्भात स्पष्टीकरण देताना ही अफवा असल्याचे म्हटलं आहे.

माय बीएमसी (mybmc) या ट्विटर अकाउंटवरुन व्हायरल होणारा फोटो पोस्ट करत, “मालाड (पूर्व) मधील ओमकार अल्टा माँटे येथे १६९ कोरोना बाधित रुग्ण असल्याची माहिती समाज माध्यमांमधून छायाचित्रांसह पसरवली जात आहे. आम्ही खुलासा करु इच्छितो की, सदर बातमी चुकीची असून हे छायाचित्र तेथे आयोजित तपासणी शिबीर (स्क्रिनिंग कॅम्प) चे आहे. नागरिकांनी कृपया घाबरून जाऊ नये,” असं आवाहन महापालिकेने केलं आहे.

महापालिकेनेच यासंदर्भात स्पष्टीकरण दिल्यामुळे या फोटोची सत्यता समोर आली आहे. त्यामुळे मालाडमधील इमारतीमध्ये १६९ करोनाबाधित आढळल्याचा दावा करणारा हा फोटो एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवर आल्यास तो फॉरवर्ड करु नये. अशाप्रकारे चुकीची माहिती पसरवणे हा कायद्याने गुन्हा आहे.