धारावीत करोनाचे अजून दोन रुग्ण सापडले असल्याने खळबळ उडाली आहे. यासोबतच धारावीमधील करोनाबाधितांची संख्या नऊवर पोहोचली आहे. मुकुंद झोपडपट्टी आणि धनवाडा चाळीतील व्यक्तीला करोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे. यामुले आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी धारावी लॉकडाउन करण्याची वेळ आली आहे असं सांगत चिंता व्यक्त केली आहे.

“मुंबईत सध्या चिंतेचं वातावरण आहे. लोक कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात येत आहेत. लोकांनी एकमेकांपासून अंतर ठेवलं पाहिजे. मला मान्य आहे की, आपल्याकडे राहण्यासाठी फार छोटी घरं आहेत. पण घरात टोळक्याने न बसता अंतर ठेवून बसावं आणि एकमेकांचं मनोरंजन करावं. धारावीतही चितेंची परिस्थितीत असून लॉकडाउन करण्याची गरज आहे. लोकांनी बाहेर आल्यास एक-दीड फुटाचं अंतर ठेवावं. हातात सॅनिटायझर किंवा साबण असावा. मुख्यमंत्री कायम सर्वांशी संपर्कात आहेत. आम्हाला सूचनाही मिळतात. काही गोष्टी आम्ही थेट करतो. यंत्रणांनी राबावं आणि लोकांनी स्वैर वागावं असं करू नये,” असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे.

पुण्यात मृतांची संख्या १३ वर
पुण्यात चिंता वाढली असून मृतांची संख्या १३ वर पोहोचली आहे. आज पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील नायडू, नोबेल आणि ससून रुग्णालयात करोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. करोनाने झोपडपट्टी असणाऱ्या परिसरात शिरकाव केल्याने चिंतेचं वातावरण असल्याचं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे.

दरम्यान राज्यातीत करोनाबाधितांची संख्या १०७८ वर पोहोचली आहे. आज दिवसभरात ६० नवे रुग्ण सापडले आहेत. मुंबईत ४४, पुण्यात नऊ, नागपूरमध्ये चार आणि अहमदनर, अकोला आणि बुलडाण्यात प्रत्येक एक रुग्ण सापडला आहे.