करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात २१ दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर केलं. याचवेळी त्यांनी करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) हा एकमेव पर्याय असल्याचं सांगितलं. लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे लोकांच्या घराबाहेर निघण्यावर निर्बंध आले आहेत. महत्त्वाचं काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं बजावण्यात आलं आहे. जीवनाश्यक वस्तूंची दुकानं सुरु असली तरी काही लोकांना मात्र अडचणी जाणवत आहे. विराली ही अशीच एक तरुणी असून ती दिव्यांग आहे. मालाडमध्ये ती एकटीच राहते.

विरालीने ट्विटरच्या माध्यमातून आपल्याला ज्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे त्यासंबंधी तक्रार करत मुंबई पोलिसांकडे मदत मागितली होती. विरालीने ट्विटरवर लिहिलं होतं की, “मी दिव्यांग असून एकटीच राहते. माझा स्वयंपाक आणि इतर गोष्टी करणाऱ्या मोलकरणीची मला गरज आहे. पण करोनामुळी ती घऱाबाहेर पडू शकत नाही. अशा परिस्थितीत आपण काय करु शकतो ?”.

विरालीचं हे ट्विट चांगलंच व्हायरल झालं होतं. सध्या मुंबईकरांसाठी जीव धोक्यात घालून काम करत असणाऱ्या मुंबई पोलिसांनी तात्काळ या ट्विटची दखल घेतली. मुंबई पोलिसांनी विरालीकडे तिचा संपर्क क्रमांक देण्याची विनंती केली. यानंतर विरालीने फेसबुकच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी केलेल्या मदतीची माहिती देत त्यांचे आभार मानले.

विरालीच्या ट्विटची दखल राज्यसभा खासदार भागवत कराड यांनीदेखील घेतली होती. त्यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना याची माहिती देत मदत करण्यास सांगितलं. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरालीला हवी ती मदत मिळेल याची पूर्ण काळजी घेतली. पोलीस अधिकारी विरालीच्या घरी पोहोचले होते. यावेळी त्यांनी विरालीला कोणताही त्रास होणार नाही याची सर्व व्यवस्था केली. विरालीच्या मोलकरीण आणि ड्रायव्हरला घरी पोहोचण्यासाठी कोणताही त्रास होणार नाही याचीही सोय करण्यात आली.

विरालीने यासंबंधी माहिती देताना सांगितलं की, “काही वेळापूर्वी डीसीपींचा मला फोन आला होता. त्यांनी मला पोलीस अधिकारी तुमची समस्या सोडवण्यासाठी तुमच्या घऱी येत असल्याची माहिती दिली. आश्वासन दिल्याप्रमाणे ते माझ्या घरी आले. जे काही माझं म्हणणं आहे ते त्यांनी लिहून घेतलं. आणि आता माझा चालक आणि मोलकरीण यांच्यासाठी एक पत्र देत आहेत जेणेकरुन लॉकडाउनमध्ये पोलीस त्यांना अडवणार नाहीत”.

मुंबई पोलिसांच्या या कृत्यामुळे त्यांचं कौतुक केलं जात आहे. अनिल देशमुख यांनीही यानंतर ट्विट करत कठीण परिस्थितीत माणुसकी विसरता कामा नये असं म्हटलं आहे.