– संदीप आचार्य

मुंबईत करोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहे तसेच मृत्यूंची संख्याही वाढत आहे. देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत हे प्रमाण जास्त असून मुंबईतील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य राहिल, असे डॉ संजय ओक यांनी सांगितले. करोनामुळे मरण पावलेल्यांमध्ये मधुमेह, रक्तदाब, ह्रदय विकाराच्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक असून अशा रुग्णांचे आरोग्य व्यवस्थापन परिणामकारकपणे केल्यास मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश येईल, असा विश्वासही डॉ ओक यांनी व्यक्त केला.

प्रिन्स जहांगिर हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या डॉ संजय ओक यांची राज्य शासनाने मुंबईत करोनाच्या गंभीर रुग्णांवरील उपचाराची दिशा निश्चित करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. डॉ ओक हे विख्यात बालशल्यविषारद असून यापूर्वी पालिकेच्या नायर व केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून तसेच पालिका वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांचे संचालक म्हणून अनेक वर्षे काम केले होते. डि. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे कुलगुरू म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली असून त्याच्या अध्यक्षतेखालील नऊ सदस्यांच्या समितीत मुंबईतील खाजगी रुग्णालयातील नामवंत डॉक्टरांचा समावेश आहे.

मुंबईत करोनाबाधित गंभीर व अत्यावस्थ रुग्णांच्या उपचाराची दिशा निश्चित करणे, गंभीर रुग्णांवरील उपचारासाठी निश्चित केलेल्या रुग्णालयात विशेषज्ञ व अन्य आवश्यक कर्मचारी वर्गाची नेमकी किती गरज आहे याचा अभ्यास करणे तसेच या रुग्णांवरील औषधोपचाराची कार्यपद्धती ठरवणे आणि अन्य रुग्णालयातील गंभीर झालेल्या रुग्णांना त्यांच्यासाठी असलेल्या रुग्णांलयात कशाप्रकारे हलवले जावे याची कार्यपद्धती तयार करण्याची जबाबदारी डॉ संजय ओक यांच्या अध्यक्षतेखालील समितीवर सोपवली आहे.

मुंबईतील करोनाच्या रुग्णांची वाढती संख्या, मृत्यूचे वाढते प्रमाण व त्यामागची कारणे काय असे डॉ ओक यांनी विचारले असता ते म्हणाले, करोनाच्या चाचण्यांची संख्या वाढविल्यामुळे रुग्णांची आकडेवारी वाढलेली दिसते. आम्ही लोकांपर्यंत वेळेत पोहोचलो नाही तर करोनाच्या रुग्णांची संख्या वाढलेली दिसेल, अशी भीतीही डॉ ओक यांनी व्यक्त केली. यासाठी मुंबईतील चाचण्यांचे प्रमाण वेगाने वाढवणे गरजेचे आहे. ज्या ज्या विभागात रुग्ण आढळत आहेत ते विभाग सील करण्याबरोबरच तेथील संबंधितांची तात्काळ चाचणी होणे गरजेचे आहे. करोनाबाबत सुरूवातीपासून योग्य दिशेने पावले टाकली जात असून करोनाच्या गंभीर व अत्यवस्थ रुग्णांवर आता प्रामुख्याने नानावटी, सेंट जॉर्ज, सैफी, वोकहार्ट, सेव्हन हिल्स व बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. महापालिका व खासगी रुग्णालये तसेच तेथील डॉक्टर एकत्र येऊन करोनाचा लढा लढत आहेत. आता आम्ही गंभीर रुग्णांवरील उपचाराची दिशा व धोरण निश्चित करून मुंबईतील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करू, असेही डॉ संजय ओक यांनी सांगितले.

“अमेरिकेसह अनेक देशांनी करोनाला अटकाव करण्यासाठी लॉकडाऊनसह योग्य उपाय तातडीने केले नाहीत. त्याचा मोठा फटका या देशांना बसला आहे. भारताने वेळेत पावले उचलली. मुंबईतही पहिल्यापासून पालिका व सरकार काम करत असून आता हा वेग वाढवला पाहिजे. कालपर्यंत आरोग्याला म्हणावे तसे प्राधान्य व निधी कधी दिलेच गेले नाही. निधीचा अभाव ही महत्वाची बाब आता सर्वांनीच अधोरेखित झाली आहे. त्यामुळे आता करोनाला रोखण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होईल हे निश्चित असून गरज आहे ती वैद्यकीय उपचार नियोजनाची. करोनाच्या एकूण मृत्यूंमध्ये मधुमेह, रक्तदाब, मूत्रपिंड विकार, श्वसनाचे आजार तसेच ह्रदयविकाराच्या रुग्णांचे प्रमाण मोठे आहे आणि तेच खरे आव्हान आहे,” डॉ ओक यांनी सांगितले.

“या क्षणाला आमच्याकडे दाखल होणाऱ्या प्रत्येकाची या दृष्टीने तपासणी करून उपचाराची मार्गदर्शक तत्वे निश्चित करावे लागतील. पहिल्या टप्प्यातच करोनावर उपचार करताना मधुमेह, रक्तदाब नियंत्रणात ठेवल्यास रुग्ण गंभीर वा अत्यवस्थ स्थितीपर्यंत जाणार नाही याची काळजी घेतली जाईल. तसेच गंभीर व अत्यवस्थ रुग्णांचा मधुमेह आटोक्यात आणताना प्रतिकार शक्ती वाढून रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी आमची समिती उपाययोजनांचा आराखडा निश्चित करेल,” असेही डॉ ओक यांनी सांगितले.