मुंबई : सोमवारी मुंबईत ५२९ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर १९ रुग्णांचा मृत्यू झाला. रविवारी चाचण्या कमी के ल्या जात असल्यामुळे ही संख्या कमी झाली आहे. रविवारी २०,१३३  चाचण्या करण्यात आल्या असून बाधितांचे प्रमाण २.६२ टक्के  आहे. रुग्णवाढीचा दर ०.१० टक्क्यांपर्यंत आला आहे.

सोमवारी ५२९ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधितांची संख्या ७ लाख १७ हजारांपुढे गेली आहे. एका दिवसात ७२५ रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत ६ लाख ८४ हजारांहून अधिक  म्हणजेच ९५ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.  त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या घटली आहे. सध्या १५ हजार ५५० उपचाराधीन रुग्ण आहेत.

धारावीत शून्य रुग्ण

धारावीत सोमवारी एकही रुग्ण आढळला नाही.  गेल्या काही दिवसांपासून धारावीत एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढय़ाच दैनंदिन रुग्णांची नोंद होत होती. धारावीत यापूर्वी जानेवारी आणि फे ब्रुवारीतही तीनदा शून्य रुग्णांची नोंद झाली होती. गेल्यावर्षी एप्रिलमध्ये धारावीत दिवसभरातील सर्वाधिक जास्त म्हणजे ९९ रुग्ण आढळले होते. त्यानंतर रुग्णसंख्या कमी होऊ लागली होती व २२ जानेवारीला एकही रुग्ण आढळला नव्हता.  धारावीत सध्या १३ उपचाराधीन रुग्ण आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात ३५१ बाधित

ठाणे : ठाणे जिल्ह्य़ात ३५१ करोना रुग्ण आढळले, तर २३ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्य़ातील ३५१ रुग्णांपैकी कल्याण-डोंबिवली ८८, ठाणे ७०, नवी मुंबई ६५, मीरा-भाईंदर ५६, ठाणे ग्रामीण ३७, बदलापूर ११, अंबरनाथ १०, उल्हासनगर सात आणि भिवंडीत सात रुग्ण आढळले. तर २३ मृतांपैकी नवी मुंबई सहा, बदलापूर पाच, ठाणे चार, मीरा-भाईंदर दोन, कल्याण-डोंबिवली दोन, अंबरनाथ एक, उल्हासनगर एक, ठाणे ग्रामीण एक आणि भिवंडीत एकाचा मृत्यू झाला.