करोना पॉझिटिव्ह रूग्ण आणि करोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या संख्येत मुंबईने मंगळवारी चीनला मागे टाकले. करोनाचा उगम चीनमध्ये २०१९ च्या उत्तरार्धात झाला होता, त्यानंतर मार्चमध्ये भारतभरात लॉकडाउन करण्यात आला. पण मुंबईतील करोनाबाधित आणि मृत्यूंची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढतानाच दिसते आहे. त्यातच मंगळवारी मुंबईतील करोनाने या आकडेवारीत चीनलाही मागे टाकल्याचे दिसून आले.

१ जुलैपासून मुंबईत दररोज १,१०० नवे करोनाबाधित रूग्ण आढळत असल्याची माहिती आयएएनस वृत्तसंस्थेने दिली आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार, मुंबईत करोनाबाधित रूग्ण बरे होण्याचा दर ६७ टक्के एवढा आहे. तर मुंबईत करोनाबाधित रूग्णांची वाढ होण्याचा दर हा १.६० टक्के इतका आहे. महाराष्ट्रात सोमवारी करोनाबाधितांची संख्या २,११,९८७ वर पोहोचली. त्यामुळे महाराष्ट्राने यात दुर्दैवाने तुर्कीला (२,०५,७५८) मागे टाकले. ४ जूनला महाराष्ट्रातील करोनाबाधितांची संख्या जर्मनी आणि दक्षिण आफ्रिकेच्याही पुढे गेली होती. सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील करोनाबाधितांची संख्या २,११,९८७ असून एकूण ९,०२६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

त्यानंतर मुंबईतील करोनाच्या आकडेवारीने मंगळवारी चीनला मागे टाकले. अधिकृत आकडेवारीनुसार, मुंबईत सध्या ८५,७२४ करोना पॉझिटिव्ह रूग्ण आहेत आणि ४,९३८ रूग्ण करोनामुळे दगावले आहेत. तर चीनमध्ये एकूण मृत्यूची संख्या ६,३३४ आहे आणि करोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ८३,५६५ आहे. विशेष म्हणजे, चीनमध्ये सध्या दिवसागणिक नव्या करोना रूग्णांची संख्या ही १० पेक्षा कमी आहे. पण मुंबईतील धारावी विभागात आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या त्यापेक्षा जास्त आहे. यात दखल घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कठोर निर्बंधांचे पालन केल्यानंतर धारावी विभाग हा करोनाचा हॉटस्पॉट नसल्याची माहिती राज्य प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबईत आज (मंगळवारी) महालक्ष्मी रेसकोर्स, दहिसर, मुलुंड आणि बीकेसी अशा चार नव्या तात्पुरत्या स्वरूपाच्या करोना चिकित्सा केंद्रांची उभारणी करण्यात आली. यात ३,५२० बेड्सची सुविधा असल्याची माहिती आहे.