लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोव्यातून मुंबईत दाखल होणाऱ्या प्रवाशांचा करोना अहवाल पाहणी आणि तपासणीसाठी सहा मुख्य रेल्वे स्थानकांवर पालिकेच्या कर्मचाऱ्यांची पथके तैनात करण्यात येणार आहेत. तपासणीदरम्यान प्रवाशाला लक्षणे आढळल्यास प्रतिजन चाचणी करण्यात येणार असून करोनाची बाधा झाल्याचे आढळल्यास प्रवाशाची करोना केंद्रात रवानगी करण्यात येईल. बाधा नसल्याचे आढळल्यास घरी पाठविण्यात येईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, रेल्वे स्थानकावर करण्यात येणाऱ्या चाचणीचे पैसे प्रवाशांकडून घेण्यात येणार आहेत.

दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोव्यातून हवाई, रेल्वे आणि रस्तेमार्गाने महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला करोना चाचणी करूनच यावे लागेल. करोनाची बाधा झालेली नसल्याचा अहवाल पाहूनच प्रवाशांना प्रवास करण्याची अनुमती द्यावी, असे राज्य सरकारचे निर्देश आहेत.

परराज्यांतून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडय़ा बोरिवली, दादर, वांद्रे, कुर्ला, मुंबई सेंट्रल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे थांबतात. म्हणून या सहा रेल्वे स्थानकांमध्ये पालिका कर्मचाऱ्यांची पथके तैनात करण्यात येतील. दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोव्यातून येणाऱ्या प्रत्येक रेल्वेगाडीतील प्रवाशांच्या चाचणी अहवालाची पडताळणी, तसेच त्यांच्या शारीरिक तापमानाची तपासणी करण्याचे काम या पथकांना करावे लागणार आहे. प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन रेल्वेगाडीच्या प्रत्येक डब्यासाठी स्वतंत्र पथक तैनात करण्याचा पालिकेचा विचार आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

या चारही ठिकाणांहून येणाऱ्या प्रवाशांच्या चाचणी अहवालाची पडताळणी केल्यानंतर संबंधितांमध्ये करोनाची लक्षणे आढळून आल्यास त्याची तात्काळ प्रतिजन चाचणी करण्यात येणार आहे. चाचणीनंतर प्रवासी करोनामुक्त असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच त्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे. चाचणीअंती करोनाची बाधा झाल्याचे आढळल्यास संबंधित प्रवाशाची रवानगी थेट करोना केंद्रात करण्यात येईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले. या चाचणीसाठी प्रवाशांकडून ३०० रुपये घेण्यात येणार असल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

विमानतळावरही करोना तपासणी

हवाईमार्गे येणाऱ्या प्रवाशांना करोना चाचणी करूनच येण्याची सूचना करण्यात आली आहे. चारही ठिकाणच्या विमानतळांवर प्रवाशांच्या करोना चाचणी अहवालाची पडताळणी करूनच विमानात प्रवेश द्यावा असेही सूचित करण्यात आले आहे. मुंबई विमानतळावर उतरणाऱ्या या प्रवाशांचा अहवाल आणि शारीरिक तापमान तपासणीसाठी व्यवस्था करण्याची सूचना विमानतळ प्राधिकरणाला करण्यात आली आहे. वेळप्रसंगी प्रवाशांची करोना चाचणी करण्याची गरज भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे खासगी प्रयोगशाळांबरोबर करार करून चाचणीची सुविधा उपलब्ध करून घेण्याची सूचनाही पालिकेकडून प्राधिकरणाला करण्यात आली आहे. या संदर्भात योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या, असे पत्र पालिकेने प्राधिकरणाला पाठविल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी दिली.

दिल्ली, गुजरात, राजस्थान, गोव्यातून रेल्वेमार्गे येणाऱ्या प्रवाशांच्या करोना चाचणी अहवालाची पडताळणी आणि त्यांची शारीरिक तापमान तपासणी करण्यासाठी मुंबईतील सहा रेल्वे स्थानकांवर पालिकेची पथके तैनात करण्यात येणार आहेत.- सुरेश काकाणी, अतिरिक्त पालिका आयुक्त