30 May 2020

News Flash

दुर्दैवी: करोनाची लागण झालेल्या नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेचा मृत्यू

करोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे

करोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. नालासोपारा येथील रहिवासी असणाऱ्या या ३० वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं होतं. यानंतर तिला मुंबईच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. महिला नऊ महिन्यांची गरोदर होती. ४ एप्रिल रोजी संध्याकाळी महिलेचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच मृत्यू असल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे.

दरम्यान मुंबईत सोमवारी दिवसभरात ५७ नवे रुग्ण आढळले असून चार जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील करोनाबाधितांचा आकडा ४९० वर गेला आहे. त्यापैकी ३४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून ५९ जण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर अजून १५० संशयित रुग्ण दाखल आहेत. पुण्यातील रुग्णांच्या संख्येतही अचानक वाढ झाली असून सोमवारी एका दिवसात ३७ नवे रुग्ण आढळले. मुंबई आणि पुण्यात दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढत असून वेगवेगळे परिसर प्रतिबंधित करण्यात येत आहेत.

सोमवापर्यंत मुंबईत २२६ परिसर प्रतिबंधित करण्यात आले. अशा प्रतिबंधित क्षेत्रामध्ये रुग्ण तपासणीसाठी विशेष दवाखाने सुरू करण्यात आले असून सोमवारी तुळशी वाडी ताडदेव, मालाड, शीव, शिवाजी नगर, देवनार अशा दहा ठिकाणी आणखी दवाखाने सुरू करण्यात आले. त्यात डॉक्टर, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ असे पथक नेमण्यात आले आहे. आतापर्यंत जे रुग्ण सापडले त्यांच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्यासाठी पालिकेच्या आरोग्य पथकातर्फे १५ लाख नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले.

शनिवारपर्यंत भांडूप पश्चिम पूर्णपणे लॉकडाऊनचा निर्णय
लोकांची होणारी गर्दी लक्षात घेता भांडूप पश्चिम शनिवारपर्यंत पूर्णपणे लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. किराणा, भाजी, दूधही बंद करण्यात आलं आहे. एस विभाग कार्यालयात १४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळली असून त्यामधील सहा ते आठ जण भांडुपमधील आहेत. भाजी, मासळी बाजारात विनाकारण होणाऱ्या गर्दीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. गर्दी लक्षात घेता एक दिवस आड बाजार सूरु ठेवण्याचा प्रयोग झाला, मात्र गर्दी कमी न झाल्याने अखेर लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे.

जीवनावश्यक वस्तू पुरवणाऱ्या व्यक्तींचे मोबाईल नंबर जाहीर करण्यात येत आहेत. फोन करून वस्तू मागवून घ्यायच्या आहेत. संध्याकाळी पिशवी हातात घेऊन विनाकारण  भटकणाऱ्यांमुळे हा निर्णय  घेतल्याचे स्थानिक आमदार रमेश कोरगावकर यांनी सांगितलं आहे.

कळवा, मुंब्रा, दिवा आणि पुण्यातील काही भागांना पूर्ण टाळे
ठाणे जिल्ह्य़ातील कळवा-मुंब्रा आणि दिवा हे परिसर विषाणू प्रसारासाठी संवेदनशील जाहीर करीत या क्षेत्रांना तसेच पुण्यातील कोंढवा, महर्षीनगरसह काही भागांना मंगळवारपासून ‘सील’ करण्यात आले आहेत. या भागांना पूर्ण टाळे लागणार असून  औषध दुकानाव्यतिरिक्त किराणा माल आणि भाजीपाला दुकाने बंद राहणार आहेत.  कळवा परिसरात गेल्या काही दिवसात १२ तर मुंब्रा परिसरात २ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दिव्यातही रुग्णांची संख्या वाढत आहे.  संशयित रुग्णांची संख्या मोठी असून त्यांचे चाचणी अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. तरीही या भागांतील नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली होती.  करोनाबाधित रुग्णसंख्या वाढू लागल्याने आता हे परिसर पूर्णपणे टाळेबंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात कळवा-मुंब्रा विभागाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता, विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून पुढील आठवडाभर औषधांची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2020 8:34 am

Web Title: coronavirus nine month old woman died in hospital sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 भिवंडी, मुंब्य्रावर ड्रोनची नजर
2 Coronavirus outbreak : ठाणे जिल्ह्यातील करोनाबाधित शंभर पार
3 कळवा, मुंब्रा, दिव्यात वाहतुकीस बंदी
Just Now!
X