करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील प्रसिद्ध गणपती मंडळ असणाऱ्या लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सव  साजरा न करण्याचा ऐतिहासिक निर्णय आझ सकाळी जाहीर केला. मंडळाच्या या निर्णयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केलं आहे. ट्विटवरुन यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना मंडळाच्या या निर्णयामुळे कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ मिळणार असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा न करता आरोग्य उत्सव साजरा करण्यावर मंडळाच्या बैठकीत एकमत झाल्याचे सांगण्यात आलं. तसेच “यंदा राजाच्या मूर्तीची स्थापना केली जाणार नाही,” असंही लालबागचा राजा मंडळाचे सुधीर साळवी यांनी स्पष्ट केलं.

११ दिवस गणपती बाप्पाची मूर्ती न बसवता या ११ दिवसांमध्ये रक्तदान शिबिरे तसेच प्लाझ्मा थेरपी उपक्रम राबवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. सध्या महाराष्ट्रातील करोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर असतानाच राज्यासमोर असणारे करोनाचे संकट लक्षात घेता मंडळाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसेच मंडळाकडून २५ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात मंडळाने ट्विटवरुनही एक ट्विट केलं आहे.

Eknath Shinde in Raju Parwe Rally
राजू पारवेंच्या प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चालवली बाईक, कडक उन्हात टपरीवर प्यायला चहा
hatkanangale loksabha marathi news, cm eknath shinde hatkanangale marathi news
हातकणंगलेची जागा कायम राखण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे भेटीसत्र
arvind kejriwal
‘आप’चे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न; केजरीवाल यांच्या सुटकेच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान वकिलाचा दावा
Damania plea
दोषमुक्तीविरोधात दमानिया यांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल, भुजबळ कुटुंबीयांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

“लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सन २०२० लालबागचा राजाचा गणेशोत्सव साजरा न करता करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता भाविकांसाठी सदर वर्षी लालबागचा राजा ‘आरोग्य उत्सव’ साजरा करणार आहे,” असं लालबागचा राजा मंडळाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन ट्विट करण्यात आलं आहे. या ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री कार्यालय, कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅण्डलला टॅग करण्यात आलं आहे.

हेच ट्विट कोट करुन रिट्विट करत मुख्यमंत्र्यांनी, “लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा लालबागचा राजाचा गणेशोत्सव साजरा न करता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आरोग्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. लालबागच्या राजाने जनतेसाठी नेहमीच आदर्श ठेवला आहे. या निर्णयाने राज्याच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ मिळणार आहे,” अशी प्रतिक्रिया व्यक्त करत मंडाळाचे कौतुक केलं आहे.

दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनला येतात. करोनाच्या काळात ही गर्दी टाळण्यासाठी मंडळाने यंदा मूर्ती न बसवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेवर आधीच बराच ताण आहे. त्यात गणेशोत्सवामुळे होणाऱ्या गर्दीतून करोनाचा संसर्ग होऊ नये या दृष्टीने खबरदारी म्हणून मंडळानेच पुढाकार घेत हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. करोनाच्या काळामध्ये राज्यातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी रक्तदान आणि प्लाझमा थेरपी उपक्रम मंडळामार्फत राबवण्यात येणार आहे.

नवसाला पावणारा म्हणून जगभरामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या लालबागच्या राजाला ८६ वर्षांची पंरपरा आहे. मागील ८६ वर्षांपासून लालबागमधील मार्केटमध्ये राजाची मूर्ती विराजमान होते. अनेक वर्षांपासून राजाची १४ फुट उंचीच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आवर्जून येतात. मात्र यंदा करोनामुळे उत्सवाऐवजी रक्तदान शिबिरं आणि प्लाझमा थेरपी शिबिरं राबवण्यात येणार आहेत. दरवर्षी लालबागच्या राजाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा मात्र अगदी साध्यापद्धतीने आणि समाजभान राखत मंडळाने उत्सव साजरा न करण्याला प्राधान्य दिलं आहे.