समाजमाध्यमांतून पसरणाऱ्या गैरसमजांबाबत तज्ज्ञांचा निर्वाळा

मुंबई : दूध पिशव्या , वृत्तपत्र कागद या नित्यवापरातील वस्तूंच्या माध्यमातून संसर्ग पसरण्याची शक्यता नसून समाजमाध्यमांवरील अशास्त्रीय संदेशावर विश्वास ठेवण्यापेक्षा वरचेवर हात स्वच्छ करणे योग्य पर्याय असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिंबधात्मक उपाय म्हणून दिशाभूल करणाऱ्या माहितीचा समाजमाध्यमांवरील उद्रेक दिवसेंदिवस वाढतच आहे. यातच आता दूध पिशव्या , वृत्तपत्र कागद,   या रोजच्या वापरातील वस्तूच्या माध्यमातून संसर्ग पसरत असल्याच्या अफवांची भर पडली आहे. त्यामुळे काही गृहसंकुलात दूध आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना मज्जाव करण्यात येत आहे.

आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक वस्तूचे र्निजतुकीकरण करून वापरणे शक्य नाही. त्यामुळेच काही वेळानंतर हात सॅनिटायजर किंवा साबणाने स्वच्छ करणे हाच मार्ग योग्य असल्याचे कामा रुग्णालयाच्या अधिष्ठाता आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. अमिता जोशी यांनी स्पष्ट केले.

रोजच्या वापरातील पेपर, दूध यासह विविध वस्तूंद्वारे संसर्ग होण्याची शक्यता फारशी नाही. संसर्ग पसरण्याची आणि त्या नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेली आहेत, त्यामध्ये याचा उल्लेख नाही. तेव्हा प्रतिबंधात्मक उपायांच्या नावाखाली पसरविल्या जाणाऱ्या संदेशांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन आयएमएचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केले आहे.

वस्तूच्या पृष्ठभागावर हा विषाणू किती काळ टिकतो याबाबत अजूनही ठोस पुरावे हाती आलेले नाहीत. परंतु आपल्याकडे अद्याप तरी वस्तूमार्फत संसर्ग पसरल्याच्या घटना घडलेल्या नाहीत. त्यामुळे असे संदेश असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यात भर घालत आहेत. तेव्हा नाक, तोंड, डोळे, चेहरा याला हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ करावे, असे संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव यांनी सांगितले.

तज्ज्ञ म्हणतात..

आपल्याकडे अद्याप तरी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्गाचा प्रसार होण्याचे प्रमाण तुलनेने फारच कमी आहे. करोनाचा विषाणू धातूसारख्या कठीण आणि कापडासारख्या मऊ पृष्ठभागावर काही तास टिकत असला तरी या कालावधीबाबत अजून शास्त्रीय माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे घरात दररोज येणाऱ्या वस्तूंच्या माध्यमातून संसर्ग होईल यादृष्टीने काळजी घेण्याची आवश्यकता नाही.