ऑनलाईन भामटय़ांकडून फसवणुकीची नवी कार्यपद्धती

मुंबई : ऑनलाईन भामटय़ांनी करोनामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेले कुतूहल किंवा दहशतीचा फायदा घेत फसवणुकीसाठी नवी कार्यपद्धती सुरू केली आहे. करोनाबाबत माहिती किंवा सूचना देण्याच्या निमित्ताने फसवा ईमेल धाडून पासवर्ड किंवा अन्य तपशील चोरण्याचे प्रकार वाढले आहेत. ते रोखण्यासाठी ‘सायबर महाराष्ट्र’ने जनजागृती सुरू केली आहे.

सध्या करोनाबाबतचे कुतूहल शिगेला पोहोचले आहे. देश, राज्य, जिल्हा, तालुक्यासह आपल्या परिसरात करोनाची लागण, मृत्यू, संशयीत रुग्ण, प्रतिबंधात्मक उपाय, त्याचे परिणाम आदी विषयांची माहिती जाणून घेण्याची ओढ नागरिकांमध्ये आहे. त्यामुळेच माध्यमांसह समाजमाध्यमांवर करोनाव्यतिरिक्त अन्य कोणताही विषय चर्चेत नाही. नागरिकांमधील करानोबाबतचे कुतूहल, दहशतीचा फायदा ऑनलाईन भामटय़ांनी उचलण्यास सुरूवात केली आहे.

भामटय़ांनी नामांकित खासगी किंवा शासकीय यंत्रणेच्या नामोल्लेखाने फसवे ईमेल करतात. या ईमेलमध्ये करोनाबाबतची महत्वपूर्ण माहिती असल्याचा दावा केला जातो. माहिती जाणून घेण्यासाठी अटॅचमेन्ट दिली जाते. ती पीडीएफ, एमपी-४ किंवा डॉक्स प्रकारातील असते. प्रत्यक्षात त्याआड मालवेअरद्वारे वापरकर्त्यांचे तपशील, पासवर्ड चोरण्याचा प्रयत्न केला जातो.

कॅस्परस्काय या सायबर गुन्ह्यांविरोधी कार्यरत संस्थेने भारतासह अन्य काही देशांना अलीकडेच भामटय़ांच्या या नव्या कार्यपद्धतीबाबत अवगत केले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने सायबर यंत्रणांना करोनाआड फसवणूक कशी टाळावी, याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. फसव्या ईमेलव्यतिरिक्त भ्रमणध्वनीवर संपर्क साधून करोनाबाबत माहिती देताना बॅंक किंवा क्रेडीट डेबीट कार्ड तपशील घेऊन गंडा घातला जाऊ शकतो. करोनाग्रस्तांसह टाळेबंदीमुळे उपासमार होत असलेल्यांना मदतीच्या बहाण्यानेही फसवणूक होऊ शकते,याकडे सायबर यंत्रणांनी लक्ष वेधले आहे.

कोणत्याही परिस्थितीत कार्ड तपशील किंवा बॅंकेशी संबंधीत तपशील अनोळखी व्यक्ती देऊ नये, तसेच अनोळखी ईमेलमधील लिंक, अटॅचमेन्ट पाहाणे टाळवे आणि खातरजमा केल्याशिवाय देणगी किंवा आर्थिक व्यवहार करू नये, अशी विनंती सायबर यंत्रणांनी नागरिकांना केली आहे. सायबर महाराष्ट्रनेही नव्या कार्यपद्धतीची माहिती घेऊन जनजागृती सुरू केली आहे.

ग्राहकांना भुरळ पाडण्याचे प्रकार

भामटय़ांनी जागतिक आरोग्य संस्था(डब्ल्यूएचओ) किंवा तत्सम नामांकित खासगी किंवा शासकीय यंत्रणेच्या नामोल्लेखाने फसवे ईमेल करतात. त्यात करोनाविषयी माहिती दिली जाते. ती जाणून घेण्यासाठी अटॅचमेन्ट दिली जाते. ती पीडीएफ, एमपी-४ किंवा डॉक्स प्रकारातील असते. प्रत्यक्षात त्याआड मालवेअरद्वारे वापरकर्त्यांचे तपशील, पासवर्ड चोरण्याचा प्रयत्न केला जातो.