एक हजार २४४ नवे रुग्ण, ५२ जणांचा मृत्यू

मुंबई : सरकारी यंत्रणा करोनाच्या संसर्गावर मात करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असली तरी मुंबईमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईमधील तब्बल एक हजार २४४ जणांना रविवारी करोनाची बाधा झाली, तर ५२ जणांना प्राण गमवावे लागले, तर निरनिराळ्या रुग्णालयांमध्ये ८२६ करोना संशयितांना दाखल करण्यात आले.

मुंबईला पडलेला करोना संसर्गाचा विळखा घट्ट होत चालला आहे. रविवारी एक हजार २४४ मुंबईकरांना करोनाची बाधा झाली असून मुंबईतील करोनाबाधितांची संख्या ३९ हजार ४६४ वर पोहोचली आहे, तर रविवारी ५२ करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या एक हजार २७९ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे रविवारी दिवसभरात तब्बल ४३० करोनाबाधित बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. विविध रुग्णालयांमध्ये ८२६ करोनाचे संशयित रुग्ण रविवारी दाखल झाले असून आतापर्यंत विविध रुग्णालयांमध्ये दाखल केलेल्या संशयित रुग्णांची संख्या ३१ हजार ६९ इतकी झाली आहे.

दरम्यान,  धारावीमध्ये रविवारी ३८ रहिवाशांना करोनाची बाधा झाली असून धारावीतील रुग्णसंख्या १७७१ वर पोहोचली आहे, तर दादरमधील १० रहिवासी करोनाबाधित झाले असून येथील रुग्णसंख्या ३१९ वर पोहोचली आहे. दादरमध्ये रविवारी दोन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत दादरमधील १२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. माहिममध्ये २३ जणांना करोनाची बाधा झाली असून या भागातील रुग्णसंख्या ५०७ वर पोहोचली आहे. धारावी, दादर आणि माहिम परिसर पालिकेच्या ‘जी-उत्तर’ विभागात येत असून या कार्यालयाच्या हद्दीतील रुग्णसंख्या २५९७ वर पोहोचली आहे.

अस्लम शेख यांच्या वाहनचालकास संसर्ग

मत्स्यविकासमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या वाहनचालकाला करोनाची लागण झाल्याने त्याला घरातच विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, अस्लम शेख विलगीकरणात न गेल्याने त्यांच्यासह बैठकीत सहभागी झालेले नेते -अधिकाऱ्यांमध्ये चिंता आहे. दरम्यान, मी १५-२० दिवसांत त्या वाहनचालकाच्या संपर्कात नाही. चव्हाण नावाचे दुसरे वाहनचालक कर्तव्यावर आहेत. माझ्या कर्मचाऱ्यांसह माझीही चाचणी के ली होती. संसर्ग नसल्यामुळे मला विलगीकरणाची गरज नाही, असे शेख यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईत मृत्यूचे प्रमाण ३.२ टक्के 

उपचारांमुळे मृत्यूचे प्रमाण कमी राखण्यात मुंबई महापालिकेला यश मिळत आहे.  मुंबईतील करोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण सरासरी ३.२ टक्केआहे, तर बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सरासरी ४६ टक्केआहे.

मुंबईमधील करोनाबाधितांची संख्या शनिवार, ३० मे २०२० पर्यंत ३८ हजार २२० इतकी झाली. आतापर्यंत १६ हजार ३६४ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे, तर एक हजार २२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

डायलिसिससाठी प्रणाली कार्यान्वित

मूत्रपिंड विकाराने त्रस्त असलेल्या काही नागरिकांना करोनाची बाधा झाल्याचे आढळले होते. वेळीच डायलिसिसची सुविधा मिळू न शकल्यामुळे यापैकी काहींचा मृत्यू झाला. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने मूत्रविकारतज्ज्ञ आणि आयआयटी, मुंबईच्या अभियंत्यांनी एकत्र येऊन डायलिसिसची गरज असलेले रुग्ण आणि डायलिसिसची व्यवस्था याचे व्यवस्थापन करणारी यंत्रणा विकसित केली आहे. मूत्रपिंड विकार असलेला करोनाबाधित वा संशयितांची नोंद या प्रणालीवर केली जाते. तसेच डायलिसिस केंद्रांकडील सयंत्राची नोंदही त्यावर केली आहे. डायलिसिसची ही सेवा मध्यवर्ती समन्वयकांच्या माध्यमातून देण्यात येते. मुंबईत नोंदणीकृत १६८ डायलिसिस केंद्रे असून त्यापैकी १७  केंद्रांमध्ये मूत्रपिंड विकाराने त्रस्त करोनाबाधितांना डायलिसिसची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. करोनाबाधित मूत्रपिंड विकाराने त्रस्त रुग्णांसाठी या केंद्रांमध्ये १०५ सयंत्रांद्वारे डायलिसिस केले जाते. या प्रणालीवर ३७३ रुग्णांची नोंदणी  केली आहे.