मुंबई : धारावीमधील आणखी एका रहिवाशाचा बुधवारी करोनामुळे मृत्यू झाला असून धारावीतील मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे. तर आणखी पाच करोनाबाधित सापडले असून बाधितांची संख्या ६० झाली आहे. बुधवारी मृत्यू झालेली व्यक्ती मरकज कार्यक्रमाला हजेरी लावून परतली होती.

धारावीमधील करोनाबाधित आणि संशयितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून पालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. करोनाची बाधा झालेल्या एका ५५ वर्षीय व्यक्तीचा बुधवारी मृत्यू झाला. त्यामुळे धारावीतील मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे. बुधवारी मृत्यू झालेली व्यक्ती डॉ. बालिगा नगरसमोरील डायमंड अपार्टमेन्टमध्ये वास्तव्यास होती. त्यांना शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या व्यक्तीने तबलिगींच्या मरकज कार्यक्रमास हजेरी लावली होती. धारावीमधील आणखी पाच जणांना करोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे धारावीतील करोनाबाधितांची संख्या ६० वर पोहोचली आहे.

दादर आणि माहीम परिसरात अनुक्रमे दोन आणि एक करोनाचा रुग्ण आढळला. शिवाजी पार्क येथील ७५ वर्षीय महिला आणि ६९ वर्षीय पुरुषास करोनाचा संसर्ग झाला असून दादरमधील करोनाबाधितांची संख्या २१ वर पोहोचली आहे. माहीमच्या प्रकाश नगर परिसरातील ५५ वर्षीय पुरुषाला करोनाची बाधा झाली असून माहीममधील करोनाबाधितांची संख्या सात झाली आहे.