मुंबईत तब्बल ७१७ प्रतिबंधित क्षेत्रे * -इमारत वा काही भाग टाळेबंद केलेली संख्या ३,३३७ वर

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : एकीकडे देशभरातील टाळेबंदी शिथिल होत चालली असताना मुंबईतील जवळपास पन्नास लाख नागरिकांना आणखी काही काळ कठोर टाळेबंदीलाच तोंड द्यावे लागणार आहे. गेल्या सहा दिवसांमध्ये मुंबईमधील प्रतिबंधित क्षेत्रे ७१७ वर, तर टाळेबंद करण्यात आलेल्या इमारतींची संख्य़ा तीन हजार ३३७ वर पोहोचली आहे. प्रतिबंधित क्षेत्र आणि टाळेबंद केलेल्या इमारतींमध्ये तब्बल २१ हजार १०६ व्यक्तींना करोनाची बाधा झाली असून यामुळे ४८ लाख ५४ मुंबईकरांवर निर्बंधांचे गंडांतर ओढवले आहे.

मुंबईमध्ये हळूहळू टाळेबंदी शिथिल करण्यात येत आहे. मात्र त्याच वेळी दररोज मोठय़ा संख्येने नवे करोनाबाधित रुग्ण सापडतच आहेत. करोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर परिस्थितीनुसार संबंधित परिसर प्रतिबंधित क्षेत्रात समाविष्ट केला जातो.

सुधारित धोरणानुसार आता इमारतीत एखादा रुग्ण सापडला तर मजला वा त्याचे घर टाळेबंद केले जाते. पालिका प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्र आणि टाळेबंद इमारतीची यादी २५ मे रोजी जाहीर केली होती. त्यानंतर सहा दिवसांनी, ३१ मे रोजी पुन्हा एक यादी जाहीर केली आहे.

या यादीनुसार सहा दिवसांमध्ये प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये ३३ परिसरांची भर पडून त्यांची संख्या ७१७ वर पोहोचली आहे. तर इमारत वा तिचा काही भाग टाळेबंद केलेल्यांमध्ये ५१० ने भर पडून ही संख्या तीन हजार ३३७ वर पोहोचली आहे.

अवघ्या सहा दिवसांत प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये तीन हजार ८५ रुग्णांची भर पडली असून तेथील रुग्णसंख्या १४ हजार ४८४ झाली आहे. तर इमारत वा काही भाग टाळेबंद केलेल्या ठिकाणची रुग्णसंख्या एक हजार २३० ने वाढून सहा हजार ६२२ वर पोहोचल्याचे मुंबई महापालिकेकडूून उपलब्ध झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.