‘करोना’च्या प्रादुर्भावानंतर महसुलावर परिणाम

मुंबई : तिकीट दरातील कपातीनंतर प्रवासी संख्येचा उतरलेला आलेख नुकताच कुठे सावरलेला असताना ‘करोना’बाधेमुळे बेस्टच्या प्रवाशांमध्ये सुमारे दोन लाखांची घट झाली आहे. त्यामुळे बेस्टच्या महसुलावर परिणाम झाला आहे.

बेस्टने तिकीट दरात कपात केल्यानंतर प्रवासी संख्या वाढण्यास सुरुवात झाली. बेस्टच्या विनावातानुकूलित आणि वातानुकूलित यासह दुमजली बसगाडय़ांना एकच गर्दी झाली. दररोजची २५ ते २६ लाख असलेली प्रवासी संख्या थेट ३१ लाखांपर्यंत पोहोचली. मात्र करोनामुळे प्रवासी प्रवास टाळत असल्याने ११ मार्चपासून बेस्टची प्रवासी संख्या कमी होऊ लागली आहे. काही खासगी कार्यालयांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली आहे. त्याचाही परिणाम बेस्टच्या प्रवासी संख्येवर झाल्याचे अधिकारी सांगतात.

गेल्या आठवडय़ात ९ मार्चला बेस्टची ३०,८८,८३४ प्रवासी संख्या होती. १६ मार्चला ती २८ लाखांवर घसरल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली. ७ मार्च म्हणजेच शनिवारी प्रवासी संख्या २८ लाख होती. १४ मार्चला ती २६ लाख ३६ हजारांवर आली. मुंबईतील परिस्थिती न सुधारल्यास बेस्टच्या प्रवासी संख्येत आणखी घट होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. बेस्टने करोनापासून प्रवाशांचा बचाव करण्यासाठी बसगाडय़ांच्या स्वच्छतेवर भर दिला आहे.

सॅनिटायझरची मागणी

करोनाची लागण बेस्ट कर्मचाऱ्यांना होऊ नये यासाठी सर्व बेस्ट बस, आगारामधील कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावे, चालक व वाहकांना मास्क उपलब्ध करून देण्याची मागणी दि बी.ई.एस.टी. वर्कर्स युनियनच्या वतीने बेस्ट उपक्रमाकडे करण्यात आल्याची माहिती सरचिटणीस शशांक राव यांनी दिली.