05 June 2020

News Flash

Coronavirus : बैठय़ा वस्त्यांमध्ये धोक्याची घंटा

धारावी पाठोपाठ बेहराम पाडय़ात करोनाबाधित

धारावीत करोनाचे संक्रमण वाढू लागल्याने याठिकाणी प्रत्येक रस्त्यावर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रत्येक नागरिकाची काटेकोर चौकशी करण्यात येत आहे.

वरळी कोळीवाडा, धारावी पाठोपाठ बेहराम पाडय़ात करोनाबाधित; रहिवाशांच्या मुक्तसंचारामुळे पेच

मुंबई : वरळी कोळीवाडा, जिजामाता नगर, धारावीपाठोपाठ आता वांद्रे येथील बेहरामपाडय़ात करोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे पालिका प्रशासनाची झोप उडाली आहे. मात्र करोनापासून बचावाचे उपाय आणि संचारबंदीचे आदेश खुंटीला टांगून गावठाणे, कोळीवाडे आणि झोपडपट्टय़ांमधील रहिवाशी स्वैरसंचार करीत आहेत. परिणामी, झोपडपट्टय़ा, कोळीवाडे, गावठाणांमध्ये धोक्याची घंटा वाजू लागली आहे.

करोनाबाधित सापडल्याने वरळी कोळीवाडा, जिजामाता नगर, धारावी, बेहरामपाडय़ातील काही परिसरात भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे. त्यात वांद्रे येथील अति दाटीवाटीच्या बेहरामपाडय़ातही एक रुग्ण सापडल्याने सरकारी यंत्रणांचे धाबेच दणाणले आहेत. अस्ताव्यस्त पसरलेल्या बेहरामपाडय़ात संसर्ग वाढल्यास मोठा हाहाकार उडेल अशी भीती पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

उच्चभ्रू वस्त्यांमध्ये घरकाम करणाऱ्या महिला, टॅक्सी-रिक्षा चालक, रस्त्याच्या कडेला पथारी पसरुन व्यवसाय करणारे फेरीवाले, खासगी कंपनीत छोटी-मोठी नोकरी करणारे अशी असंख्य मंडळी झोपडपट्टय़ांच्या आश्रयाला आहेत. रोजागाराच्या शोधात मुंबईत दाखल झालेले अनेक जण झोपडपट्टय़ांमध्ये वास्तव्य करीत आहेत. मुंबईच्या एकूण लोकसंख्येच्या ६० टक्के जनता कुलाब्यापासून मुलुंड, दहिसपर्यंत विखुरलेल्या निरनिराळ्या झोपडपट्टय़ा, गावठाणे आणि कोळीवाडय़ांमध्ये वास्तव्यास आहेत. इतकेच नव्हे तर काही टेकडय़ांवरही झोपडपट्टय़ांचे साम्राज्य पसरले आहे. काही झोपडपट्टय़ांमध्ये करोनाचे रुग्ण सापडले आहेत. मात्र झोपडपट्टीवासीयांचा दिनक्रम ‘जैसे थे’च सुरू आहे. मास्कचा वापर न करताच ही मंडळी सर्वत्र फिरत आहेत.

टाळेबंदी आणि संचालबंदीमुळे कामासाठी बाहेर पडता येत नसले तरी रहिवाशी झोपडपट्टय़ांमधील छोटय़ा रस्त्यांवरुन स्वैरसंचार करीतच आहेत. झोपडपट्टय़ांमधील दुकाने नित्यनियमाने उघडली जात आहेत. उच्चभ्रू वस्तींमधून झोपडपटय़ांमध्ये करोना पसरला. त्यात दिल्लीहून तबलिगींची भर पडल्याने झोपडपटय़ांमध्ये करोना फै लावतो आहे. धारावीमध्ये करोनामुळे मृत्यू झालेल्याचा तबलिगी कार्यक्रमाशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. त्याची पुनरावृत्ती अन्य झोपडपट्टय़ांत होण्याचा धोका आहे.

स्थानिक पोलीस, काही सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते वारंवार वस्त्यांमध्ये फिरुन नागरिकांना घराबाहेर पडू नका असे वारंवार आवाहन करीत आहे. मात्र या वस्त्यांमधील नागरिक या आवाहनाला वाटाण्याच्या अक्षता लावताना दिसत आहेत. दहिसरचे गणपत पाटील नगर, मालवणी, मानखुर्द, गोवंडी, गोळीबार, चिताकॅम्प यासह उपनगरांमधील अनेक झोपडपट्टय़ा, गावठाणे, कोळीवाडय़ांमध्ये वेळीच काळजी घेणे गरजेचे बनले आहे.

कोळीवाडय़ात नवीन २४ रुग्ण, धारावीत १३

वरळी कोळीवाडय़ामधील २१ जणांना करोनाची बाधा झाल्याचे उघड झाले होते. दरम्यानच्या काळात वरळी कोळीवाडय़ातील १५० हून अधिक जणांना पोदार रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यापैकी २४ जणांना करोनाची बाधा झाल्याचे चाचणीअंती उघड झाले आहे. त्यामुळे वरळी कोळीवाडय़ातील करोनाबाधितांची संख्या ४५ वर पोहोचली आहे. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. धारावीमधील करोनाबाधितांची संख्या १३ वर पोहोचली असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2020 3:14 am

Web Title: coronavirus outbreak coronavirus positive case in behrampada bandra zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 Coronavirus : दक्षिण मुंबई अतिसंवेदनशील ; आतापर्यंत रुग्णसंख्या अडीचशेवर
2 Coronavirus Test : ‘अ‍ॅण्टिबॉडी चाचणी’च्या नावाखाली लुटीचा डाव?
3 Coronavirus : ब्रीचकॅण्डीतील परिचारिका वसतीगृह बंद
Just Now!
X