करोना व्हायरसबाबत सर्व आवश्यक माहिती मुंबईकरांना घरबसल्या केवळ एका फोनवर देण्याचा प्रयत्न मुंबई महापालिकेने केला आहे. महापालिकेने १९१६ हा हेल्पलाइन नंबर जारी केला असून या नंबरवर करोना पेशंटसाठी नजीकच्या कोणत्या रुग्णालयात जागा होऊ शकेल हे जलदगतीनं समजण्याची खास सोय करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या ‘१९१६’ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून ‘३’ क्रमांक निवडल्यास ‘कोविड’ रुग्णांसाठी जवळच्या कोणत्या रुग्णालयात खाटा उपलब्ध आहेत याबाबत तात्काळ माहिती मिळेल. तर, ‘१’ क्रमांक निवडल्यास ‘कोविड’ विषयी डॉक्टरांचे टेलिफोनिक मार्गदर्शन मिळेल.

क्रमांक ‘१’ निवडल्यास करोनाबाबत तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन संबंधितांना देण्यात येते. या मार्गदर्शनादरम्यान डॉक्टरांना संबंधित व्यक्तीची वैद्यकीय चाचणी गरजेची आहे असे वाटल्यास, त्यांना त्यांच्या घराजवळच्या वैद्यकीय प्रयोगशाळेचा संपर्क क्रमांक देण्यात येतो. याशिवाय, ज्या व्यक्तींना रुग्णवाहिकेची गरज आहे, त्यांनी ‘१९१६’ या क्रमांकावर संपर्क साधून नंबर ‘२’ असा पर्याय निवडल्यास रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. करोनाव्यतिरिक्त पालिकेशी संबंधित नागरी सेवा सुविधासाठी १९१६’ या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर नंबर ‘४’ हा पर्याय निवडावा लागेल.

तसेच, विविध रुग्णालयांमध्ये खाटांपैकी उपलब्ध असलेल्या खाटांची माहिती लवकरच ‘रियल टाईम’ पद्धतीने देखील अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. “हे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच यासाठी ‘बुक माय शो’सारख्या खासगी संस्थांची मदत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे”, असे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संचालक महेश नार्वेकर यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेच्या १९१६ या हेल्पलाईनवर कोरोनाबाबत नागरिकांना मार्गदर्शन, त्यांचे शंकेचे निरसन करण्यासाठी काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले. त्याचबरोबर आता रुग्णालयांची माहिती देण्याची सुविधाही पालिकेने उपलब्ध करून दिली आहे.