मुंबई : करोनाशी लढा देताना शहरात आत्तापर्यंत पाच खासगी डॉक्टरांना जीव गमवावा लागला आहे.  सोमवारी शल्यविशारद डॉ. चित्तरंजन भावे (६१) यांचा रहेजा रुग्णालयात तर डॉ. शशांक मुळगावकर (५६) यांचा रविवारी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये करोनामुळे मृत्यू झाला. याआधी तीन खासगी डॉक्टरांचा करोनाने मृत्यू झाला आहे.

रहेजा रुग्णालयात सेवा देत असणारे डॉ. भावे यांना रुग्णाची शस्त्रक्रिया केल्यानंतर काही दिवसांतच करोनाची लक्षणे जाणवू लागली. त्यांची चाचणी सकारात्मक आल्याने रहेजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचे रुग्णालय प्रशासनाला कळविले. रुग्णालयात जागा उपलब्ध नसल्याने ते घरीच थांबले होते. सहा तासांनी खाट उपलब्ध झाल्यावर ते स्वत: गाडी चालवीत रुग्णालयात दाखल झाले. चार दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना मधुमेह होता. तसेच त्यांची हृदयशस्त्रक्रियाही झालेली होती. त्यांची प्रकृती गंभीर झाल्यावर तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करून कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने(आयएमए) दिली.

डॉ. मुळगावकर यांचेही करोनामुळे निधन झाले. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही गिरगावातील सदाशिव लेन परिसरातील आपला दवाखाना सुरू ठेवणारे डॉ. शशांक मुळगावकर यांना करोनाची बाधा झाली होती. त्यामुळे त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रविवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, सर्जन मुलगा असा परिवार आहे. पेडर रोड येथील दळवी हॉस्पिटलच्या संचालक मंडळावर ते सचिव होते. तसेच गिरगावातील साहित्य संघाचे विश्वस्त आणि संचालक मंडळाचे सदस्य होते. गिरगावातील हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या स्वागत समितीचेही ते सदस्य होते. गिरगावातील अनेक सामाजिक संस्थांचे आधारस्तंभ होते.

खासगी डॉक्टरांनाही विमा सरंक्षण द्या

करोनाशी झुंज देताना मृत्यू झालेल्या रुग्णांना वीरचक्र देऊन सन्मानित करावे. सरकारी डॉक्टरांप्रमाणे खासगी डॉक्टरांनाही ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण द्यावे. तसेच वैयक्तिक सुरक्षा साधने अजूनही खासगी डॉक्टरांना उपलब्ध होत नसून औषध दुकानांमध्ये त्वरित उपलब्ध करावीत, अशी मागणी आयएमएने केली आहे.