बाधित रुग्णांमध्ये ६० टक्के पुरुष, तर ४० टक्के महिला

मुंबई : मुंबईतील करोनाबाधितांची संख्या जसजशी वाढत आहे, तसतसा मृतांचा आकडाही वाढतो आहे. मुंबईतील मृत्यूचा दर ३.३ टक्के असला तरी एकूण बाधितांचा आकडा वाढल्यामुळे दरदिवशी होणारे मृत्यूही वाढत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून दर दिवशी ५० च्या वर रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत आहे. विशेष म्हणजे एकूण मृतांमध्ये ५० ते ७० वयोगटातील रुग्णांचा मोठय़ा प्रमाणावर समावेश आहे.

मुंबईतील करोनाबाधितांच्या संख्येच्या दुपटीचा वेग कमी झाला आहे आणि मृत्यूदर ३.३ टक्केच कायम असल्याबद्दल पालिकेने स्वत:ची पाठ थोपटून घेतलेली असली तरी दर दिवशी होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यातही ५० ते ७० वयोगटातील रुग्णांचा करोनाने बळी जात आहे. ८ जूनपर्यंत मुंबईत १७०० करोनाबळींची नोंद झाली. त्यापैकी ९९९ मृत्यू ५० ते ७०

वयोगटातील आहेत. तर आतापर्यंत दोन बालकांचाही मृत्यू झाल्याचे आकडेवारीवरून पुढे आले आहे

मुंबईत एकूण करोनाबाधितांची संख्या ५० हजारांच्यापुढे गेली आहे. त्यापैकी २२,९४२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर २६,१७८ रुग्ण सक्रिय असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बाधितांमध्येही ३० ते ६० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण सर्वात जास्त आहे.

कामानिमित्त बाहेर जाणारा, अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणारा हा वयोगट आहे. त्यामुळे साहजिकच या वयोगटात संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. बाधितांमध्ये पुरुषांचे प्रमाण ६० टक्के असून महिलांचे प्रमाण ४० टक्के आहे. एकूण मृतांमध्ये ५० ते ७० वयोगटातील रुग्णांचा समावेश अधिक आहे.

बाधितांचे आणि मृत्यूचे प्रमाण

वय वर्षे           बाधितांची संख्या     मृतांची संख्या

० ते १०                  ८८५                      २

१० ते २०               १६५७                    ४

२० ते ३०               ७७१८                   २४

३० ते ४०               ९१७८                   ८३

४० ते ५०               ९२६६                   २७४

५० ते ६०                ९७८२                 ५०४

६० ते ७०                ६५०८                 ४९५

७० ते ८०                २९४१                 २३३

८० ते ९०               ८९७                    ६९

९० ते १००             १०९                   ११

* ९१६ रुग्णांची स्थिती गंभीर

* मुंबईतील मृत्यूचा दर ३.३ टक्के असला तरी एकूण सक्रिय रुग्णांपैकी ४ टक्के रुग्ण गंभीर आहेत.

* लक्षणे नसलेले रुग्ण- १८,४४० (७० टक्के)

* लक्षणे आहेत पण प्रकती स्थिर- ६७६९ (२६ टक्के)

* गंभीर परिस्थिती- ९१६ (४ टक्के)