दिवसभरात २,५०० हून अधिक करोनामुक्त

मुंबई : मुंबईतील काही भागांत रुग्ण दुपटीचा कालावधी वाढत असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात येत असला तरी शनिवारी मुंबईमध्ये  एक हजार ४६० जणांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ७३ हजार ७४७ वर पोहोचली आहे.

दिवसभरात ४१ जणांचा मृत्यू झाला असून, यापूर्वी मृत्युमुखी पडलेल्या ६४ जणांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे दोन हजार ५८७ रुग्ण बरे होऊन शनिवारी रुग्णालयातून घरी गेले. मुंबईमधील एकूण करोनामुक्त झालेल्यांची संख्या ४२ हजार ३३१ इतकी आहे.

वांद्रे, माटुंगा आदी भागांतील रुग्ण दुपटीचा काळ १०० दिवसांहून अधिक झाला आहे. तर आठ प्रशासकीय विभागांमध्ये तो ५० दिवसांहून अधिक आहे. असे असले तरीही शनिवारी मुंबईमध्ये  एक हजार ४६० जणांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबईतील करोनाबाधितांची संख्या ७३ हजार ७४७ वर पोहोचली आहे.

गेल्या २४ तासांमध्ये पालिकेच्या हाती आलेल्या कागदपत्रांवरून ४८ तासांमध्ये ४१ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. तर तत्पूर्वी मृत्युमुखी पडलेल्या ६४ जणांना करोना झाल्याचे शनिवारी हाती आलेल्या चाचणी अहवालावरून स्पष्ट झाले. मुंबईच्या विविध भागांतील ८८८ करोना संशयित रुग्णांना शनिवारी निरनिराळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. शनिवारी दोन हजार ५८७ रुग्ण बरे झाले आहेत.

गैरहजर पोलिसांवर गुन्हा

मुंबई : कोणतेही सबळ कारण न देता गैरहजर राहणाऱ्या सहा अंमलदारांविरोधात बोरिवली पोलिसांनी गुन्हा नोंदवला. करोनाकाळात मुंबईत पोलिसांविरोधातही ही पहिलीच कारवाई आहे.पोलीस नाईक प्रदीप आगवणे, शिपाई प्रशांत भोसले, विश्वनाथ नामदार, हरिश्चंद्र भोसले, प्रदीप बाबर, प्रियंका चव्हाण अशी या अंमलदारांची नावे आहेत.