टाळेबंदीमुळे घरी पोहोचणे कठीण; रस्त्यावर राहून दिवस ढकलण्याची वेळ

नीलेश अडसूळ, अमर सदाशिव शैला

मुंबई : करोनाचा प्रसार तुरुंगातील कैद्यांमध्ये होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील तरुंगातून कैद्यांना घरी सोडले जात आहे. त्यानुसार टाळेबंदीनंतरच्या दहा दिवसात मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहातून नोटीस बजावून, जामीन देऊन अनेक कैद्यांना घरी सोडण्यात आले. मात्र तरुंगातून सोडल्यावर हे कैदी वाऱ्यावर असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीच उपाययोजना तुरुंग प्रशासनाने केली नसल्याचे चित्र आहे. घरी जाण्यासाठी वाहतुकीची साधने उपलब्ध नाहीत. तर सुरक्षेसाठी मास्क नाहीत, अशी कैद्यांची स्थिती आहे. परिणामी धोकादायक पद्धतीने रस्त्यावर झोपूनच या कैद्यांना रात्र काढावी लागत आहे.

दीपक गुजराल हे त्यांनी दिलेला धनादेश न वटल्याने फसवणुकीच्या एका गुन्ह्य़ात गेला महिनाभर ऑर्थर रोड कारागृहात बंद होते. व्यवसायातील मंदीमुळे परतफेड शक्य झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. शुक्रवारी त्यांना जामिनावर सोडण्यात आले. पुण्यातील भोसरी येथे राहणाऱ्या दीपक यांना घरी कसे जायचे असा प्रश्न होता. परंतु तुरुंगातून बाहेर पडताना त्यांच्या खिशात एक रुपयाही नव्हता. तसेच कारागृहात आणताना तेथे चप्पल जमा केली असल्याने अनवाणी पायांनीच त्यांना तुरुंगाबाहेर पडावे लागले. दादर भाजी मंडईत भाजीपाला घेऊन येणारी गाडी मिळेल या आशेवर ते तेथे आले.

करोनापासून संरक्षणासाठी मास्क देण्याची मागणी त्यांनी वाटेत गस्तीवर असलेल्या पोलिसांना केली. मात्र पोलिसांनी याला असमर्थता दर्शविल्याचे दीपक यांनी सांगितले. मात्र दादरला पोहचताच ही भाजी मंडई बंद असल्याचे दीपक यांना समजले. परिणामी दादर येथील कबुतरखाना परिसरातील फुटपाथवर झोपूनच त्यांना रात्र काढावी लागली. घरी जाण्यासाठी शनिवारी पहाटेच त्यांनी प्रवास सुरू केला. बेस्ट बसचालकांना नवी मुंबईत सोडण्याची विनंती करूनही त्यांनी अत्यावश्यक सेवेचे कारण पुढे करत बसमध्ये घेण्यास नकार दिला. तुरुंग प्रशासनाने दिलेली चिठ्ठी दाखवूनही अनेकांनी त्यांना बसमध्ये घेतले नाही. परिणामी एका चालकाला विनवणी केल्यावर त्याने नवी मुंबईपर्यंत सोडले.