लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून केलेल्या टाळेबंदीमुळे व एकूणच करोनाच्या भीतीमुळे मुंबईत लहान बालकांचे लसीकरण मात्र रखडले आहे. पालिकेतर्फे होणाऱ्या नियमित लसीकरणाची क्षेत्रीय व केंद्रीय शिबिरे आयोजित करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांत मुंबईत बालकांचे लसीकरणाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. लसीकरण वेळेत न झाल्यामुळे त्यांच्याशी संबंधित आजारांचेही प्रमाण वाढणार आहे.

गेल्या तीन महिन्यांत करोना आजाराशी लढण्यात सगळी सरकारी यंत्रणा व्यस्त असल्यामुळे अन्य आजारांवर उपचार मिळणे मुश्कील झाले आहे. त्यातच बालकांचे लसीकरणही रखडले आहे. पालिकेच्या रुग्णालयात लसीकरणास जाण्याकरिता लोक घाबरतात, तर खासगी डॉक्टरांचे दवाखाने बंद असल्यामुळे लसीकरण थांबलेले आहे. कोविड आजाराचा ही अवस्था किती काळ अशीच राहणार याचा कोणालाच अंदाज नसल्यामुळे पालिकेने आता बालकांच्या लसीकरणासाठी पालिकेच्या दवाखान्यात लसीकरण शिबिरे आयोजित करण्याचे ठरवले आहे.

पालिकेचे सर्व दवाखाने (फिव्हर क्लिनिक दवाखाने वगळून) व प्रसूतिगृहे यामध्ये आठवडय़ातून एक दिवस सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत लसीकरणाची शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. प्रसूतिगृहात आठवडय़ातून दोनदा लसीकरण शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. याबाबतचे परिपत्रक नुकतेच पालिकेच्या आरोग्य विभागाने काढले आहे.

करोनापूर्व काळात आठवडय़ातून दोनदा क्षेत्रीय शिबिरे आयोजित केली जात होती. ती या तीन महिन्यात घेतलेलीच नाहीत. मात्र आता केंद्रीय शिबिरातून ही लसीकरणाची कामे पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली.

टाळेबंदीमुळे लसीकरण थोडे पुढे गेले आहे हे खरे आहे. त्याला नाइलाज होता. आता लसीकरणाला उशीर झाला तरी घाबरण्याचे कारण नाही, लसीकरण आताही केले तरी चालते. फक्त दोन डोसमधील अंतर बरोबर असणे आवश्यक आहे.

-डॉ. पद्मजा केसकर, मुख्य कार्यकारी अधिकारी