शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई : मुखपट्टीसह वैयक्तिक सुरक्षा साधने यांचे काटेकोरपणे पालन केल्याने करोना विभागात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये बाधितांची संख्या कमी आढळत आहे. त्या तुलनेत बिगरकरोना विभागात काम करणारे आरोग्य कर्मचारी अधिक संख्येने बाधित झाल्याचे शहरातील खासगी करोना रुग्णालयात केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेरो सर्वेक्षणात आढळले आहे.

इंडियन जर्नल ऑफ मेडिकल बॉयोलॉजी या वैद्यकीय नियतकालिकेत नुकताच हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. ७५० खाटांची क्षमता असलेल्या या करोना रुग्णालयात २५०० आरोग्य कर्मचारी कार्यरत असून यातील दहा टक्के म्हणजे २४४ कर्मचाऱ्यांची प्रतिपिंड (अ‍ॅण्टीबॉडी) चाचणी जूनमध्ये केली. करोना संसर्गाचा प्रादुर्भाव या काळात सर्वाधिक होता आणि जवळपास ४०० रुग्णांनी या रुग्णालयातून उपचार घेतले होते. कर्मचाऱ्यांपैकी १८२ जणांना कोणतीही लक्षणे नव्हती, तरी यातील ८ जणांमध्ये (४.३ टक्के) प्रतिपिंडे आढळली. तीन परिचारिका, दोन प्रशासकीय कर्मचारी, दोन डायलिसिस तंत्रज्ञ आणि एक साहाय्यक कर्मचारी यांचा समावेश असून यातील एकही जण करोना विभागात कार्यरत नव्हते. आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण तुलनेने कमी आहे.

महत्त्वाचे म्हणजे २४४ मधील २६ जणांना याआधी अंगदुखी, अशक्तपणा इत्यादी सौम्य लक्षणे होती. यांच्या तपासण्या झालेल्या नव्हत्या. परंतु यातील ७० टक्के कर्मचाऱ्यांत प्रतिपिंडे आढळली. त्यामुळे सौम्य लक्षणे असली तरी आणि आरटीपीसीआर चाचणीत बाधित नसल्याचे आढळले तरी अशा कर्मचाऱ्यांच्या दोन आठवडय़ांनी प्रतििपड चाचण्या करण्याचे या अभ्यासात सूचित केले आहे.जूनमध्ये प्रतिपिंड चाचण्या या नव्याने दाखल झाल्याने याची अचूकता तपासणे हाही अभ्यासाचा उद्देश होता. आरटीपीसीआर चाचणीत बाधित असल्याचे नोंद झालेल्या २३ कर्मचाऱ्यांच्याही यात चाचण्या केल्या असून यातील ९१ टक्के जणांत प्रतिपिंडे आढळली. त्यामुळे या चाचण्या अचूक असल्याचे यावरून स्पष्ट होते, असे अभ्यासात मांडले.

प्रतिपिंड चाचण्याही आवश्यक

सौम्य लक्षणे असूनही यातील अनेकांनी फारसा त्रास होत नसल्याने किंवा घरी तीन- चार दिवस आराम केल्यावर बरे वाटल्याने करोना चाचण्या केलेल्या नव्हत्या. तसेच त्यावेळी चाचण्यांवर र्निबध होते. ताप किंवा काही ठोस लक्षणे असल्याशिवाय चाचण्या करत नव्हते. या अभ्यासानंतर मात्र रुग्णालयात चाचणी नियमावलीत बदल करत सौम्य लक्षणे असलेल्यांच्याही चाचण्या करण्यास मान्यता दिली गेली. त्यामुळे वेळेत निदान करणे, रुग्णालयात संसर्ग प्रसार रोखणे शक्य झाले. रुग्णालयात कर्मचाऱ्यांच्या करोना चाचण्यांसह प्रतिपिंड चाचण्या झाल्यास त्यांची आरोग्य स्थिती समजू शकते. यासाठी आता कर्मचाऱ्यांच्या नियमित चाचण्यांमध्ये प्रतिप्रिंड चाचण्यांचाही समावेश केला आहे.

करोना विभागातील बाधित कर्मचाऱ्यांचे प्रमाण तुलनेने फार कमी आहे. येथील कर्मचारी मुखपट्टी, सुरक्षा साधनांचा वापर योग्य रीतीने करतात. परंतु रुग्णालयातील इतर भागात ते के ले जातेच असे नाही.
– डॉ. तनू सिंघल, अभ्यासाच्या लेखिका