लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबईमध्ये पुन्हा करोना संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर यंदा ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाणदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी दादरच्या चैत्यभूमीवर येऊ नये. अनुयायांनी आपल्या घरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन पालिका, पोलीस अधिकाऱ्यांसह विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने गुरुवारी करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पाश्र्वभूमीवर विविध संघटनांची एक बैठक पालिकेच्या जी-उत्तर विभाग कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पालिका, पोलीस खात्यांच्या अधिकाऱ्यांसह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. किरण दिघावकर यांनी बैठकीत या कामांचा आढावा घेतला. करोना संसर्ग लक्षात घेऊन अनुयायांनी चैत्यभूमीवर न येताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरातूनच अभिवादन करावे, असे आवाहन विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी केले. तर अनुयायांनी चैत्यभूमी स्मारक, दादर (पश्चिम), मुंबई- ४०००२८ या पत्त्यावर पत्र पाठवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन विश्वशांती सामाजिक संस्थेने केले आहे.

बोरिवली येथील गोराई परिसरातील दी ग्लोबल विपश्यना पॅगोडा ५ ते ७ डिसेंबर दरम्यान बंद ठेवण्यात यावा, अशी विनंती पालिकेकडून संबंधितांना करण्यात आली होती. त्याची दखल घेत संबंधित संस्थेने या काळात पॅगोडा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.