अमर सदाशिव शैला, लोकसत्ता

मुंबई : राज्य सरकारने टाळेबंदी काळात मद्यविक्रीला परवानगी दिल्यानंतर मद्यसेवनाचे परवान्यांना मागणी वाढली आहे. १ मेपासून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे राज्यभरातील १ लाख २० हजार मद्यग्राहकांनी परवान्यांसाठी ऑनलाइन अर्ज केले असून त्यातील सुमारे १ लाख १० हजार परवाने वितरित करण्यात आले आहेत. मुंबई शहर आणि उपनगरात मिळून सुमारे २९,५०० जणांनी ऑनलाइन मद्यपरवाने घेतले, तर नागपूरमध्ये ३२ हजार, ठाण्यात ११,६०० जणांना परवाने वितरित करण्यात आले. तर विभागाच्या कार्यालयांबाहेर रांगा लावून ऑफलाइन पद्धतीने परवाने घेणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे.

टाळेबंदीमुळे राज्यातील बहुतांश भागातील मद्यविक्री दुकाने गेले दोन महिने बंद होती. परिणामी सरकारला मोठा महसूल गमवावा लागला. तिसऱ्या टप्प्यात मद्याची दुकाने सुरू करण्याची परवानगी सरकारने दिली. मात्र मद्य खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी होऊन सामाजिक अंतराचे तीनतेरा वाजल्यामुळे सरकारने  हा निर्णय मागे घेतला. आता पुन्हा एकदा सरकारने काही ठिकाणी मद्याची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली, तर काही भागात अटी शर्तींसह घरपोच मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. मुंबई, ठाण्यासह राज्याच्या काही भागात गर्दी टाळण्यासाठी सद्यस्थितीत फक्त घरपोच मद्यविक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र विक्रे त्यांना परवानाधारकांनाच मद्यविक्री करता येते. त्यामुळे घरपोच मद्य मिळविण्यात अडचण येऊ नये यासाठी परवाने काढण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी विविध कागदपत्रांची पूर्तता करून ऑनलाइन अर्ज करण्यात येत आहेत.

ऑनलाइन परवाने वितरण सुरू झाल्यावर मुंबई उपनगर जिल्ह्यातून तीन हजार व्यक्तींनी परवाने घेतले. महिनाभरात यात लक्षणीय वाढ झाली असून राज्य उत्पादन विभागाने एकटय़ा मुंबई उपनगरात चालू महिन्यात एक वर्ष आणि आजीवन कालावधीचे ऑनलाइन पद्धतीने २०,७५० मद्यसेवन परवाने वितरित केले आहेत. तर मुंबई शहर जिल्ह्यात सुमारे ८,७५० जणांनी ऑनलाइन पद्धतीने परवाने घेतले आहेत. तर सुमारे ३ हजार जणांनी रांगेत उभे राहून ऑफलाइन पद्धतीने परवाने घेतले आहेत.

आजीवन परवान्यांकडे कल

मद्यसेवनाच्या एक वर्ष वैधतेच्या परवान्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून १०० रुपये शुल्क, तर आजीवन काळासाठीच्या परवान्यासाठी १ हजार रुपये शुल्क आकारले जाते. परवाने घेणाऱ्यांमध्ये २५ ते ४० या वयोगटातील तरुणांची संख्या लक्षणीय असल्याचे माहिती अधिकाऱ्यांनी दिली, तर एक वर्षांचा परवाना काढण्याऐवजी आजीवन काळाचा परवाना घेण्याकडे नागरिकांचा कल असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.