रेल्वेची विशेष सेवा सुरू; मुंबईतून १३ रेल्वे गाडय़ा राज्याबाहेर

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : रेल्वेकडून सोमवारपासून देशभरात २०० विशेष रेल्वे फेऱ्यांना सुरुवात झाली. यात रविवारी मध्यरात्री पहिली गाडी मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकातून वाराणसीसाठी रवाना झाली. या गाडीतून १,७०० प्रवाशांनी प्रवास के ला. पहिल्याच दिवशी मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून एकू ण १३ गाडय़ा राज्याबाहेर रवाना करण्यात आल्याने १६ हजारपेक्षा जास्त प्रवासी मुंबईतून परराज्यांत गेल्याचे सांगण्यात आले.

या विशेष गाडय़ांच्या प्रवासासाठी रेल्वेकडून काही अटी घालण्यात आल्या होत्या. प्रवासासाठी ९० मिनिटे आधी स्थानकात पोहोचणे आवश्यक आहे. त्यानुसार रविवारी मध्यरात्री १२.१० वाजता वाराणसी गाडी पकडण्यासाठी सीएसएमटी स्थानकात प्रवाशांनी प्रवेश के ला. आरोग्य सेतू अ‍ॅप बंधनकारक करतानाच प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंगही करण्यात येत होते. रेल्वेकडून सर्व उपाययोजना के ल्या जात होत्या. सर्व प्रक्रि या पूर्ण के ल्यानंतर १,७०० प्रवाशांना घेऊन गाडी रवाना झाली. स्थानकात के वळ कन्फर्म तिकीट असणाऱ्या प्रवाशांना प्रवेश दिला जात असल्याने प्रवाशांशिवाय तिकीट तपासनीस, रेल्वे व पालिका कर्मचारी, सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांचा  समावेश होता. या गाडीनंतर सोमवारी सकाळी ८.०५ वाजता बेंगळूरुसाठीही दुसरी गाडी रवाना झाली. दुपारी तीन वाजेपर्यंत सीएसएमटी ते भुवनेश्वर, एलटीटी ते दरभंगा आणि वाराणसीसाठी गाडय़ा गेल्या. त्यानंतर रात्री ११.३० पर्यंत गडग, गोरखपूर, पाटलीपुत्रसाठी अशा एकू ण आठ गाडय़ा रवाना झाल्या.

आठ गाडय़ांमधून सुमारे १० हजार प्रवाशांचा प्रवास होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. पश्चिम रेल्वेवरूनही वांद्रे टर्मिनस आणि मुंबई सेन्ट्रल येथून एकू ण पाच गाडय़ा रवाना करण्यात आल्या. अहमदाबाद, जयपूर, जोधपूर, अमृतसरसाठी रवाना झाल्या आणि या गाडय़ांमधूनही सुमारे सहा हजारपेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास के ला. सामाजिक अंतरापासून सर्व नियमांचे या वेळी पालन करण्यात आले.