लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातच नव्हे, तर अवघ्या देशातील करोना केंद्र बनलेल्या मुंबईत टाळेबंदी हटवण्याची पूर्वघोषणाच गर्दीला पुरेशी ठरू लागली आहे. टाळेबंदी हटवण्यास दोन दिवस शिल्लक असतानाच रस्त्यांवर अवतरलेली वाजवीपेक्षा जास्त खासगी आणि रिक्षा-टॅक्सीसारखी सार्वजनिक वाहने, जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त विविध प्रकारच्या दुकानांची उघडलेली दारे आणि या दुकानांमध्ये खरेदीसाठी उसळलेल्या गर्दीवरून सोमवारी मुंबईने दोन दिवस आधीच पुनश्च हरिओम के ल्याचे चित्र होते. हे चित्र शहर, पूर्व, पश्चिम उपनगर असे सर्वत्र होते.

३० जूनपर्यंत टाळेबंदी असली तरी  ३, ५ आणि ८ जूनला टप्प्याटप्प्याने र्निबध शिथिल होणार आहेत. प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे व्यवसाय सशर्त सुरू के ले जाणार आहेत. मात्र त्याआधीच मुंबईतल्या बहुतांश भागांत किराणा माल, दूध, औषधांची विक्री करणाऱ्या दुकानांसह तयार कपडे, पादत्राणांची शोरूम, हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक उपकरणांची दुकाने, वाहनांची डागडुजी करणारी गॅरेज सोमवारी सकाळी खुली केली गेली. विशेष म्हणजे खुल्या झालेल्या प्रत्येक आस्थापनेबाहेर नागरिकांनी खरेदीसाठी बरीच गर्दी के ल्याचे चित्र होते, तर काही दुकानांमध्ये साफसफाई के ली जात होते.

दुसरीकडे टाळेबंदीतील वाहतुकीवरील र्निबध जराही शिथिल झालेले नसताना शहराच्या प्रत्येक भागात सोमवारी सकाळी वाजवीपेक्षा जास्त वाहने उतरली. त्यात दुचाकी, कारसह रिक्षा, टॅक्सींचीही संख्या जास्त होती.

शहरातल्या मान्सूनपूर्व कामांप्रमाणे रहिवाशी वस्त्या, झोपडपट्टय़ांमध्ये ताडपत्री किं वा मेणकापडाने छप्पर आच्छादने, कौले शाकारणे, गच्ची किं वा भिंतींमधील भेगांमधून पाणी गळू नये यासाठी तात्पुरती, कायमस्वरूपी डागडुजी, सज्जांची साफसफाई आदी कामांसाठी धांदल असते. टाळेबंदीच्या आधीच्या टप्प्यात वस्त्यांमधील ही महत्त्वाची कामे रखडली होतीत. मात्र सोमवारी टाळेबंदी झुगारून नागरिक पावसाळी तयारीच्या खरेदी आणि कामांमध्ये गुंतले. त्यामुळे हार्डवेअरसह, तयार कपडे, शालेय साहित्याची दुकाने, छत्र्या किं वा रेनकोट विक्री करणारे व्यावसायिक आणि पादत्राणांच्या दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी दिसली. त्यासोबत शहरातील बहुतांश गॅरेजसमोर डागडुजीसाठी येऊन पडलेल्या, येणाऱ्या वाहनांची गर्दी होती. चिखल उडू नये म्हणून दुचाकींना फलॅप लावून घेण्यापासून हरप्रकारची कामे नागरिकांनी करून घेतली.

विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई

टाळेबंदीच्या प्रत्येक टप्प्याच्या सुरुवातीला हेच चित्र दिसले. अनेकदा संभ्रमातून वाहनांसह नागरिक मोठय़ा संख्येने बाहेर पडत होते. सोमवारीही हाच संभ्रम किं वा अधीरतेतून दुकाने खुली के ली गेली असावीत, वाहने बाहेर पडली असावीत, अशी प्रतिक्रि या वाहतूक पेालीस देतात. वाहतूक पोलिसांनी मागच्या अनुभवामुळे सोमवारी शहरात सकाळपासून विनाकारण रस्त्यांवर उतरलेल्या वाहनांवर कारवाई के ली. स्थानिक पोलिसांनीही जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त अन्य दुकाने बंद करण्याच्या सूचना केल्या.