07 July 2020

News Flash

अग्निशमन दल ‘आगीतून फुफाटय़ात’

बचाव कार्यात ‘सामाजिक अंतर’ पाळणे तारेवरची कसरत

अग्निशमन दलाच्या जवानांची अवस्था बचाव कार्यात पाळाव्या लागणाऱ्या ‘सामाजिक अंतरा’च्या नव्या कार्यपद्धतीमुळे आगीतून फुफाटय़ात पडल्यासारखी झाली  आहे.

इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता

मुंबई: कुठे इमारत पडली, कुठे आग लागल्यास जिवाची पर्वा न करता काही मिनिटात घटनास्थळी पोहोचणाऱ्या आणि प्रसंगी दुर्घटनेत अडकलेल्यांना बाहेर काढून त्यांचा जीव वाचविणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांची अवस्था बचाव कार्यात पाळाव्या लागणाऱ्या ‘सामाजिक अंतरा’च्या नव्या कार्यपद्धतीमुळे आगीतून फुफाटय़ात पडल्यासारखी झाली  आहे.

करोनाच्या काळात सर्वच क्षेत्रांसाठी नवीन कार्यपद्धती अमलात आणावी लागणार आहे. सगळीकडेच सामाजिक अंतर पाळावे लागणार आहे, हे खरे असले तरी अग्निशमन दलासाठी ती तारेवरची कसरत ठरणार आहे. अग्निशामक दलाचा स्वसंरक्षण पोशाख असतो, त्यात डोक्यासाठी विशिष्ट प्रकारचे शिरस्त्राण, ग्लोव्हज यांचा समावेश असतो. मात्र त्यांनाही आता आगीव्यतिरिक्तच्या वर्दीवर जाताता पांढरे पीपीई कीट घालून जावे लागत आहे. त्यात अग्निशमन दलाच्या कामामध्ये कायमस्वरूपी धोका असतो. पण यापुढे एखाद्या इमारतीला आग लागल्यास आम्ही तिथे गेलो तर आत अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढताना तिला ताप आहे का किंवा तिला करोना झाला असेल याचा विचार न करता बचावकार्य करावे लागेल. अन्यथा अडकलेल्या व्यक्तीचा बचाव करण्यास वेळ लागू शकतो, अशी प्रतिक्रिया एका जवानाने दिली.

एखाद्या बंद घरातून मृतदेह बाहेर काढायचा असला की पोलीस अग्निशमन दलाला बोलावतात. यापुढे अशा घटनेत मृतदेह हा करोनाग्रस्ताचादेखील असू शकतो. हे गृहीत धरूनच परिस्थिती हाताळावी लागणार असल्याची प्रतिक्रिया आणखी एका जवानाने व्यक्त केली आहे. भेंडीबाजारमध्ये सोमवारी एका वर्दीवर गेलेल्या जवानाची प्रतिक्रिया अगदी बोलकी आहे. तो म्हणतो, एखादी दुर्घटना घडली की तिथे बघ्यांची एकच गर्दी जमते. त्यांना परिस्थितीचे भानच नसते. अशा लोकांमुळे आमच्या जिवाला आणखी धोका निर्माण होऊ शकतो. कारण त्यांच्यात काही करोनाबाधित असू शकतात.

प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जवानांना पीपीई किट देण्यात आले आहेत. पण हे किट ज्या प्लास्टिकपासून बनलेले आहेत ते घालून आगीशी मुकाबला करणे शक्य नाही. त्यामुळे तिथे जवानांना आपला नेहमीचाच स्वसंरक्षणाचा पोशाखच घालून जावे लागते.  सामाजिक अंतर पाळणे या नियमाला आम्हाला नक्कीच काही वेळेला मर्यादा येतात, अशी प्रतिक्रीया अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

अशी आहे नवीन कार्यपद्धती

कामावर येताना आता प्रत्येक जवानाची, कर्मचाऱ्याची तपासणी केली जाते. थर्मामीटरने त्याचा ताप आणि प्राणवायूची तपासणी करून मगच त्याला कामावर रुजू करून घेतले जाते.

कामावर आलेल्या प्रत्येकाच्या स्वत:च्या स्वच्छतेबरोबरच, साहित्याची स्वच्छता, र्निजतुकीकरण करण्यात येते.

एखाद्या वर्दीवर जाण्यापूर्वी आणि वर्दीवरून आल्यानंतर स्वत:च्या स्वच्छतेबरोबरच साहित्याचे आणि गाडय़ांचे र्निजतुकीकरण केले जाते.

पूर्वी केवळ आगीच्या वर्दीवर असलेल्यांसाठीच श्वसन उपकरण दिले जात होते, आता मात्र प्रत्येक वर्दीवर ते घातले जाते.

आगीच्या वर्दीव्यतिरिक्त प्रत्येक वर्दीवर पीपीई किट घालून जाण्याचे बंधनकारक आहे.

सांघिक पद्धतीने काम करणे ही आमच्या क्षेत्राची गरज आहेच. मात्र शक्य तेवढी प्रतिबंधात्मक काळजी आम्ही घेत आहोत. त्याकरिता नवीन कार्यपद्धती लागू केली आहे. त्यानुसार काम करीत आहोत. परंतु काही बाबतीत आम्हाला मर्यादा आहेतच. त्या गृहीत धरूनच काम करावे लागणार आहे.

– प्रभात रहांगदळे, प्रमुख अग्निशमन दल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 3:00 am

Web Title: coronavirus pandemic work conditions of firefighters no so good dd70
टॅग Coronavirus
Next Stories
1 टाळेबंदीत मद्यशौकिनांचा कायदेशीर पेयमार्ग
2 ‘..तरीही कार्यरत’ : मुंबईची ‘वेळ’ अविरत पाळणारे हात
3 ‘आयआयटी’चे रान बिबटय़ाला मोकळे
Just Now!
X