13 August 2020

News Flash

धारावीतील रुग्णवाढीचा वेग मंदावला

सात लाख रहिवाशांची तपासणी, मृत्यूचे प्रमाण ३.७६ टक्के

सात लाख रहिवाशांची तपासणी, मृत्यूचे प्रमाण ३.७६ टक्के

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : मुंबई महापालिकेच्या पथकांनी घरोघरी जाऊन सात लाखांहून अधिक रहिवाशांची केलेली तपासणी, रुग्णसेवेसाठी सज्ज झालेले पालिका दवाखाने आणि खासगी दवाखाने, ज्येष्ठ नागरिकांचा शोध घेऊन केलेले उपचार, करोनाबाधितांच्या संपर्कातील संशयितांचे विलगीकरण यामुळे धारावीमधील करोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात पालिकेला यश येत आहे.

धारावीत आतापर्यंत १८९९ जणांना करोनाचा संसर्ग झाला होता. त्यापैकी ४६.८५ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. धारावीतील मृत्यूचे प्रमाण ३.७६ टक्के असून आतापर्यंत ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. धारावीतील रुग्णवाढीचा वेग मंदावल्याचा दावा पालिकेने केला आहे.

काही दिवसांपूर्वी धारावीत मोठय़ा संख्येने करोनाबाधित सापडत होते. त्यामुळे पालिकेने खासगी डॉक्टरांचा सहभाग असलेली पथके स्थापन करून घरोघरी जाऊन रहिवाशांची तपासणी मोहीम हाती घेतली. या पथकांनी आतापर्यंत चार लाख ७६ हजार ७७५ रहिवाशांची तपासणी केली. पालिकेचे नऊ, तर खासगी ३५० दवाखाने सुरू करण्यात आले. खासगी डॉक्टरांनी ४७ हजार ४०० जणांची, तर पालिकेच्या दवाखान्यांमध्ये ८७९ जणांची तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर आठ हजार २४६ ज्येष्ठ नागरिकांची तपासणी झाली.

खासगी डॉक्टरांनी मोबाइल व्हॅनद्वारे १४ हजार ९७० रहिवाशांना तपासले. याशिवाय अन्य खासगी डॉक्टरांच्या दवाखान्यांमध्ये सुमारे दोन ते अडीच लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली. अशा  एकूण सात लाखांहून अधिक धारावीकरांची तपासणी झाली. तपासणीदरम्यान करोनाबाधितांच्या संपर्कातील, तसेच सौम्य, मध्यम लक्षणे आढळलेल्या संशयित रुग्णांना तातडीने संस्थात्मक विलगीकरणात पाठवण्यात आले.

धारावीमध्ये अतिजोखमीच्या गटात १० हजार ४१२, तर कमी जोखमीच्या गटात ३८ हजार १२५ व्यक्तींचा समावेश होता. सुमारे ३८ हजार ३४ संशयित रुग्णांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले होते. अतिजोखमीच्या गटातील सुमारे आठ हजार ४१० संशयित रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले. वेळीच उपचार झाल्याने यापैकी बहुतांश व्यक्ती बऱ्या झाल्या असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.

रुग्णसेवेसाठी सुरू ठेवलेले पालिकेचे दवाखाने आणि खासगी दवाखाने, तसेच पथकांनी घरोघरी जाऊन रहिवाशांची केलेली तपासणी यामुळे धारावीतील करोनाबाधित आणि संशयितांवर वेळीच उपचार करता आले. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आणि मृत्यूचे प्रमाण कमी झाले. आता रुग्णवाढीचा वेगही मंदावला आहे.

– किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त, जी-उत्तर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2020 2:05 am

Web Title: coronavirus patient growth rate in dharavi slowed down zws 70
Next Stories
1 खाटांचे नियोजन विभाग स्तरावरून
2 Coronavirus : मुंबईत मृतांची वाढती संख्या ; दिवसभरात ६१ मृत्यू, १४२१ नवे रुग्ण
3 संजय गांधी उद्यानातील अतिक्रमणावर अखेर कारवाई
Just Now!
X