एकूण प्रवासीसंख्येच्या तुलनेत २० टक्क्यांचीच घट; तरीही गर्दी कमी होण्यास सुरुवात

मुंबई : ‘करोना’ विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी घरून काम तसेच कार्यालयांत ५० टक्के उपस्थिती असे पर्याय देण्यात आल्याचा परिणाम मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय रेल्वेवर दिसून येत आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रवासीसंख्येत १७ लाखांची घट झाली आहे.

दररोज ८० ते ९० लाख प्रवासीसंख्या असलेल्या लोकलवरील ही घट अद्याप पुरेशी नसली तरी, ‘करोना’च्या धास्तीमुळे रेल्वेप्रवास टाळण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे ‘बेस्ट’ बसच्या प्रवाशांच्या संख्येतही साधारणपणे दोन लाखांची घट झाली आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने करोनाच्या फैलावाची भीती व्यक्त केली जात आहे. या दोन्ही मार्गावरून दररोज ८० ते ९० लाख प्रवासी प्रवास करतात. सरकारी, खासगी कार्यालयात जाणारे विद्यार्थी, मालवाहक, दिव्यांग, डबेवाले अशा प्रवाशांची भर त्यात असते. त्यामुळे गर्दी कमी न झाल्यास लोकल बंद करावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना द्यावा लागला होता.  त्याचा अपेक्षित परिणाम अद्याप दिसून आलेला नाही. परंतु, प्रवासीसंख्येत लक्षणीय घट झाली आहे.

१६ मार्चला रेल्वेने ९० लाख १७ हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. यात पश्चिम रेल्वेवरील लोकल गाडय़ांमधून ४० लाख ७५ हजार ७०५ आणि मध्य रेल्वेवरील मुख्य मार्ग, हार्बर, ट्रान्स हार्बर वरील लोकलमधून ४९ लाख ४१ हजार ५६४ प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद आहे. १७ मार्चला या प्रवासी संख्येत घट झाली. पश्चिम रेल्वेवरून १७ मार्चला ३२ लाख ६० हजार ८७८ प्रवाशांनी आणि मध्य रेल्वेवरून ३९ लाख ७७ हजार ३२१ प्रवाशांची नोंद झाली आहे. थोडक्यात एका दिवसात ९० लाखांपैकी १७ लाख ७९ हजार प्रवासी कमी झाले आहेत. बेस्टची प्रवासी संख्याही दोन लाखांनी  (३० लाखांवरून २८ लाख) कमी झाली आहे.

रस्ते वाहतुकीत घट

तुलनेत रस्त्यांवरील वाहतूक कमी झाली  आहे. बुधवारी पूर्व उपनगरातील काही रस्त्यांवर शुकशुकाट होता. पूर्व उपनगरातील शीव-पनवेल महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग, घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड आणि एलबीएस रोड या ठिकाणी इतर दिवसांच्या तुलनेत बुधवारी तुरळक प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. शीव-पनवेल महामार्ग आणि घाटकोपर पंतनगर रोड या ठिकाणी तर गेल्या वर्षभरापासून मेट्रोचे काम सुरू असल्याने मोठी वाहतूक कोंडी होत आहे. मात्र बुधवारी या दोन्ही रस्त्यांवर  वाहनांची संख्या अगदीच बोटावर मोजण्याइतकी होती.

५० टक्के उपस्थितीची तपासणी

खासगी आणि आयटी कंपन्यांमध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीच्या माध्यमातून काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याची अंमलबजावणी केली जाते की नाही याची तपासणी येत्या एक ते दोन दिवसात सुरू केली जाणार आहे. सर्व विभागीय साहाय्यक आयुक्त आणि परिमंडळ उपयुक्तांना परिपत्रकाद्वारे तसे आदेश दिले आहेत. ज्या कंपनीमध्ये ५० टक्केपेक्षा जास्त उपस्थिती असेल त्या कंपनीवर कलम १८८ नुसार दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे या परिपत्रकात म्हटले आहे.