लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : एसटी, बेस्ट पूर्ण प्रवासी क्षमतेने धावत असतानाच काळ्या-पिवळ्या रिक्षा-टॅक्सींना मात्र तशी परवानगी अद्यापही राज्य शासनाने दिलेली नाही. परिणामी चालकांचे उत्पन्न बुडत असल्याचा दावा, रिक्षा व टॅक्सी संघटनांनी केला आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही संघटनांनी केला आहे. त्यामुळे सध्या रिक्षाला तिसऱ्या, तर टॅक्सीला चौथ्या प्रवाशाची प्रतीक्षाच आहे.

मुंबई शहरात साधारण ४५ हजार काळ्या-पिवळ्या टॅक्सी आहेत. यामध्ये ३,५०० टॅक्सी सहा आसनी प्रवासी क्षमतेच्या आहेत, तर उर्वरित टॅक्सी चार आसनी प्रवासी क्षमतेच्या आहेत. टाळेबंदीआधी पूर्ण प्रवासी क्षमतेने धावणाऱ्या टॅक्सींवर करोनाकाळात र्निबध आले. परिणामी चालकांचे उत्पन्नच बुडाले. सुरुवातीच्या सव्वा महिन्यात रस्त्यावर टॅक्सी धावत नव्हत्या. केवळ एकच अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्याला घेऊन जाण्याची मुभा देताना चालकाचे उत्पन्न होत नव्हते. मे महिन्यात अत्यावश्यक सेवेतील दोन कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली. ऑगस्ट महिन्यात टॅक्सीतून एकूण तीन प्रवाशांना घेऊन जाण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर तीन महिने होत आले तरीही पूर्ण प्रवासी क्षमतेने टॅक्सी चालवण्याची मंजुरी अद्यापही मिळाली नसल्याचे मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे महासचिव ए. एल. क्वाड्रोस यांनी सांगिलते. मुंबईत बेस्ट, एसटी पूर्ण प्रवासी क्षमतेने धावत आहेत मग टॅक्सी का नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पूर्ण प्रवासी क्षमतेने टॅक्सी चालवण्याची मागणी करूनही त्याची दखल घेतलेली नसल्याचे ते म्हणाले.

टॅक्सीप्रमाणेच मुंबई महानगरात धावणाऱ्या रिक्षांचीही तीच गत आहे. अत्यावश्यक सेवेतील एकच प्रवासी प्रवास करण्याची मुभा होती. त्यानंतर रिक्षातून दोन प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी मिळाली. मात्र तीन प्रवाशांना घेऊन जाण्याची रिक्षा संघटनांच्या मागणीचा विचार सरकारने केला नसल्याचे मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले.