रुग्णदुपटीचा कालावधी कमी होत असल्याने चिंता

मुंबई : आतापर्यंत मर्यादित रुग्णसंख्या असलेल्या मुलुंड, घाटकोपर, भांडुप परिसरात रुग्णदुपटीचा कालावधी कमी झाल्याचे, तर भायखळा, अंधेरी पश्चिम, ग्रॅन्ट रोड, एल्फिन्स्टन परिसरात रुग्णदुपटीचा कालावधी हळूहळू वाढल्याचे निदर्शनास आले आहे.

१८ मेपर्यंत दहिसरमध्ये सर्वात कमी म्हणजे १६०, सॅण्डहस्र्ट रोडमध्ये २८१, मुलुंडमध्ये ३०८, गोरेगावमध्ये ४०६, भांडुपमध्ये ५५५, घाटकोपरमध्ये ५७२ रुग्ण आढळून आले होते. कमी रुग्णसंख्या असली तरी या भागातील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी कमी झाल्यामुळे पालिका अधिकारी चिंतित झाले आहेत. मुलुंड आणि घाटकोपरमधील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी सात दिवसांवर आला आहे. तर भांडुपमध्ये हा कालावधी आठ दिवसांचा आहे. तसेच दहिसर, सॅण्डहर्स्ट रोड आणि गोरेगावमधील रुग्णदुपटीचा कालावधी नऊ दिवसांवर आला आहे. अन्य विभागांच्या तुलनेत या परिसरामध्ये रुग्ण संख्या कमी असली तरी तेथील रुग्णदुपटीचा कालावधी डोकेदुखी बनला आहे.

दादर, धारावीत स्थिती नियंत्रणात

दादर, माहीम, धारावी (जी-उत्तर) भागात १८ मे रोजी सर्वाधिक म्हणजे १८६८ रुग्णसंख्या होती. मात्र या भागातील रुग्णदुपटीचा कालावधी १२ दिवस आहे. तर भायखळ्यातील रुग्णसंख्या या दिवशी १६५८ वर पोहोचली होती. मात्र येथील रुग्णदुपटीचा कालावधी १८ दिवसांवर पोहोचला आहे. अंधेरी पश्चिम भागातील रुग्णदुपटीचा कालावधी १८ दिवस आहे. माटुंग्यामधील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १६ दिवसांवर आला आहे. तर मरिन लाइन्समध्ये (रुग्ण संख्या १८८), मालाड (४१४), कुलाबा (५६०), कुर्ला (१३१९), माटुंगा (१६४३) या भागातील रुग्णदुपटीचा कालावधी १२ दिवसांवर आला आहे. तर वांद्रे (४४०), चेंबूर (६६४), अंधेरी पूर्व (१००३) या भागातील रुग्णदुपटीचा कालावधी १३ दिवसांवर आला आहे.

वांद्रे परिसरात हजारहून अधिक रुग्ण

सुमारे सहा लाख लोकसंख्या असलेल्या एच-ई विभागतही करोनाबाधितांची संख्या एक हजाराहून अधिक झाली आहे. वांद्रे-कु र्ला कॉम्प्लेक्स, कलानगर, निर्मलनगर, बेहरामपाडा हा परिसर या विभागात येतो. या भागात १,१३८ रुग्ण आढळून आले आहेत. अवघ्या ९-१० दिवसांत येथे ६०० हून अधिक करोनाबाधित सापडले आहेत.

करोना रुग्णांची विभागनिहाय संख्या

१,७२१ ’ जी-नॉर्थ (धारावी, दादर, माहीम)

१,२७३ जी साऊथ (वरळी, लोअर परळ, प्रभादेवी, महालक्ष्मी)

११३८ एच ईस्ट (वांद्रे-पू, खार-पू, सांताक्रुझ-पू)

१,२९६ ई (भायखळा, मुंबई सेंट्रल, नागपाडा, माझगाव)

१,२२६ के  वेस्ट (अंधेरी-प, विलेपार्ले-प, जुहू)

१,२२५ एफ नॉर्थ (माटुंगा, सायन, वडाळा)

१,२३० एल (कुर्ला, चुनाभट्टी, साकीनाका)