06 August 2020

News Flash

“करोनातून सुटका कशी होईल तेवढेच सांगा साहेब, प्रवचने नकोत”, शिवसेनेचा फडणवीसांना टोला

प्रवचने देण्यापेक्षा संपूर्ण धारावी पालथी घालून केलेले यशस्वी काम पाहायला हवे, शिवसेनेचा फडणवीसांना सल्ला

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस. (संग्रहित छायाचित्र)

करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरुन टीका करणाऱ्या माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेकडून सामना संपादकीयच्या माध्यमातून जोरदार टीका करण्यात आली आहे. सुटका कशी होईल तेवढेच सांगा साहेब. आता प्रवचने नकोत असा टोला शिवसेनेने लगावला आहे. प्रवचने देण्यापेक्षा एकदा संपूर्ण धारावी पालथी घालून सरकारी यंत्रणेने केलेले यशस्वी काम पाहायला हवे असा सल्लाही यावेळी देण्यात आला आहे. सोबतच आरएसएसने केलेल्या कामामुळेच धारावी करोनामुक्त झाल्याचा दावा करणाऱ्या भाजपा नेत्यांवरही टीका केली आहे.

काय म्हटलं आहे संपादकीयमध्ये –
“देवेंद्र फडणवीस हे सध्या राज्यभर दौरे करून करोना संकटाची माहिती करून घेत आहेत व करोनाशी लढताना सरकार कसे अपयशी ठरले आहे यावर रोज प्रवचने झोडत आहेत. त्यापेक्षा त्यांनी एकदा संपूर्ण धारावी पालथी घालून सरकारी यंत्रणेने केलेले यशस्वी काम पाहायला हवे. करोना हे शंभर वर्षांतले सर्वात मोठे संकट आहे अशी नवी दुर्मिळ माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनीदेखील आता दिली. करोनामुळे उत्पादन, नोकऱ्या तसेच आरोग्यावर अभूतपूर्व असा नकारात्मक परिणाम पाहायला मिळाला आहे, असेही दास म्हणतात. या सगळ्या नकारात्मक परिणामांतून जनता सध्या जात आहे. त्यातून सुटका कशी होईल तेवढेच सांगा साहेब. आता प्रवचने नकोत,” असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

“करोनाचे संकट वाढत आहे. उत्तर प्रदेशसारख्या राज्यांनी पुन्हा एकदा कठोर लॉकडाउन केले. त्यांना हे लॉकडाउन का करावे लागले, हा प्रश्नच आहे. काही दिवसांपूर्वी आपले पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेशात करोना नियंत्रणात आणण्यासाठी योगी सरकारने जे कष्ट घेतले, जे एक यशस्वी ‘मॉडेल’ राबवले त्याचे कौतुक केले. आम्हीही त्याच मताचे आहोत. यंत्रणात आल्याशिवाय देशात करोनाविरुद्धचे युद्ध जिंकता येणार नाही. त्यामुळे केंद्राने उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यांकडे करोनासंदर्भात जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे. उत्तर प्रदेश ‘मॉडेल’वर पुन्हा कडक लॉक डाऊन लादण्याची वेळ यावी याचा अर्थ काहीतरी चुकले आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

“बिहारमध्ये विधानसभा निवडणुका येत आहेत. त्यामुळे भाजपास हे राज्यसुद्धा करोनासंदर्भात महत्त्वाचे आहे. या सगळय़ा पार्श्वभूमीवर मुंबईतील धारावीसंदर्भात एक चांगली बातमी आली आहे. धारावीतील परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केले व त्याबद्दल शाबासकी दिली आहे. जगभरात करोनाची स्थिती हाताबाहेर जात असल्याचे निराशाजनक चित्र असले तरी अजूनही त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. इटली, स्पेन, दक्षिण कोरिया आणि मुंबईतील धारावी येथे या रोगावर ज्या प्रकारे नियंत्रण मिळविण्यात यश आले ते इतरांसाठी आदर्श असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍडॅनॉम ग्रेब्रेयासिस यांनी सांगितले. धारावी हा मुंबई उपनगराचा एक भाग आहे, पण आशिया खंडातील सगळय़ात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावी नेहमीच स्वतंत्रपणे जागतिक नकाशावर येत राहिली. धारावीसारख्या अतिगर्दीच्या, नियोजन नसलेल्या, दाटीवाटीच्या झोपडपट्टीत करोनाचा शिरकाव झाला व ते संक्रमण पसरले तर हाहाकार माजेल, कोरोनास येथून बाहेर काढणे कठीण जाईल असे वाटत होते, पण मुंबई महानगरपालिका व पोलिसांनी ही परिस्थिती उत्तमरीत्या हाताळली व तेथून कोरोनास मागे रेटले,” असं यावेळी सांगण्यात आलं आहे.

“आज धारावीतून कोरोना पूर्णपणे हटला असा दावा नाही, पण त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले हे जागतिक आरोग्य संघटनेने कबूल केले. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते फडणवीस हे सध्या राज्यभर दौरे करून कोरोना संकटाची माहिती करून घेत आहेत व करोनाशी लढताना सरकार कसे अपयशी ठरले आहे यावर रोज प्रवचने झोडत आहेत. त्यापेक्षा त्यांनी एकदा संपूर्ण धारावी पालथी घालून सरकारी यंत्रणेने केलेले यशस्वी काम पाहायला हवे, पण ‘‘धारावीत जे कोरोनावर यश मिळालं ते फक्त संघ स्वयंसेवकांमुळेच!’’ असा नवा प्रचारी फंडा राबवला जातोय. हा जरा अतिरेकच झाला. पांढऱया कपडय़ांतील देवदूतांचा अपमान आहे. म्हणजे काही चांगले घडले की, आमच्यामुळे! रेड्याला रेडकू झाले आमच्यामुळे, वाळवंटात हरभरा टरारून वर आला आमच्यामुळे. हे असले प्रकार यांना संकटसमयी सुचतात तरी कसे?,” अशी टीका शिवसेनेने केली आहे.

“संघाचे काम चांगले नाही असे कोणी म्हणणार नाही, पण धारावीतील करोना नियंत्रणाच्या कार्यात सर्वच यंत्रणांनी मेहनत घेतली आहे. हे यश सामुदायिक आहे, मात्र त्यातही मुंबई महापालिकेचे काम मोठे आहे हे तुम्ही मान्य करणार की नाही? दिल्ली, उत्तर प्रदेश, पुणे, पिंपरी-चिंचवड वगैरे भागांत स्वयंसेवकांचे अस्तित्व आहे, मग तेथे संघ धारावीप्रमाणे दक्ष का नाही? त्यामुळे संघाला करोना युद्धात उगाच ओढण्याचे कारण नाही. प्रत्येक जण आपापल्या कुवतीने लढतो आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 7:35 am

Web Title: coronavirus shivsena saamana editorial on bjp devendra fadanvis dharavi rss sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 ‘राज्यातील करोना परिस्थिती चिंताजनक’
2 प्रत्येक जिल्ह्यात करोना चाचणी प्रयोगशाळा
3 घरनोंदणीची संपूर्ण रक्कम परत करणे विकासकाला बंधनकारक
Just Now!
X