धारावीमध्ये करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक करण्यात आलं आहे. मात्र भाजपा नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) केलेल्या कामामुळेच धारावी करोनामुक्त झाल्याचा दावा केला आहे. शिवसेनेने भाजपा नेत्याचा दावा फेटाळून लावत हे असले प्रकार यांना संकटसमयी सुचतात तरी कसे? अशी विचारणा केली आहे, तसंच काही चांगले घडले की, आमच्यामुळे…रेड्याला रेडकू झाले आमच्यामुळे, वाळवंटात हरभरा टरारून वर आला आमच्यामुळे असा टोलाही लगावला आहे. शिवसेनेने सामना संपादकीयच्या माध्यमातून ही टीका केली आहे.

“आज धारावीतून करोना पूर्णपणे हटला असा दावा नाही, पण त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले हे जागतिक आरोग्य संघटनेने कबूल केले. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते फडणवीस हे सध्या राज्यभर दौरे करून कोरोना संकटाची माहिती करून घेत आहेत व करोनाशी लढताना सरकार कसे अपयशी ठरले आहे यावर रोज प्रवचने झोडत आहेत. त्यापेक्षा त्यांनी एकदा संपूर्ण धारावी पालथी घालून सरकारी यंत्रणेने केलेले यशस्वी काम पाहायला हवे, पण ‘‘धारावीत जे कोरोनावर यश मिळालं ते फक्त संघ स्वयंसेवकांमुळेच!’’ असा नवा प्रचारी फंडा राबवला जातोय. हा जरा अतिरेकच झाला. पांढऱ्या कपडय़ांतील देवदूतांचा अपमान आहे. म्हणजे काही चांगले घडले की, आमच्यामुळे! रेड्याला रेडकू झाले आमच्यामुळे, वाळवंटात हरभरा टरारून वर आला आमच्यामुळे. हे असले प्रकार यांना संकटसमयी सुचतात तरी कसे?,” अशी टीका शिवसेनेने केली आहे.

“संघाचे काम चांगले नाही असे कोणी म्हणणार नाही, पण धारावीतील करोना नियंत्रणाच्या कार्यात सर्वच यंत्रणांनी मेहनत घेतली आहे. हे यश सामुदायिक आहे, मात्र त्यातही मुंबई महापालिकेचे काम मोठे आहे हे तुम्ही मान्य करणार की नाही? दिल्ली, उत्तर प्रदेश, पुणे, पिंपरी-चिंचवड वगैरे भागांत स्वयंसेवकांचे अस्तित्व आहे, मग तेथे संघ धारावीप्रमाणे दक्ष का नाही? त्यामुळे संघाला करोना युद्धात उगाच ओढण्याचे कारण नाही. प्रत्येक जण आपापल्या कुवतीने लढतो आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.