लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: लोकल प्रवासात प्रवाशांमध्ये शारीरिक अंतर राहावे यासाठी दोन आसनांमधील आसन रिक्त ठेवले जाणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वेने मधल्या आसनांवर ‘कृपया येथे बसू नका’ असे आवाहन करणारी स्टिकर्स लावण्यास सुरुवात केली आहे. अर्थात गर्दीच्या वेळी या आवाहनाला कितपत प्रतिसाद मिळेल याबाबत साशंकता आहे.

रेल्वे प्रवास अनेक श्रेणींतील व्यक्तींकरिता खुला के ल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढते आहे. सध्या दररोज ६ लाख प्रवासी रेल्वेने प्रवास करत असून त्यांच्यासाठी १,५८० लोकल फेऱ्या चालविल्या जात आहेत. करोनाकाळात खबरदारीचा उपाय म्हणून शारीरिक अंतर ठेवून प्रवास व्हावा किंवा गर्दी होऊ नये यासाठी सर्वसामान्यांसाठी लोकल अद्याप सुरू केलेली नाही. १,२०० प्रवासी आसनक्षमतेच्या १२ डब्यांच्या लोकलमध्ये केवळ ७०० प्रवासी प्रवास करू शकतील, अशी अट रेल्वेकडून अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू करताना घालण्यात आली होती. अर्थात गर्दीच्या वेळी हा नियम कागदावरच राहत असल्याचे चित्र आहे. आता रेल्वेने आसनांवर स्टिकर्स लावण्याचे ठरविले आहे. मात्र गर्दीच्या वेळी हा नियमही हवेतच राहण्याची शक्यता आहे.

बसून प्रवास करताना शारीरिक अंतर राहावे यासाठी मधल्या आसनावर ‘कृपया येथे बसू नका’ असे आवाहन करणारे स्टिकर्स लावल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले. काही गाडय़ांना स्टिकर्स लावण्यात आले आहेत. येत्या काळात सर्वच लोकल गाडय़ांमधील आसनांवर आवाहन करणारे स्टिकर्स बसवले जातील.

उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या सरचिटणीस लता अरगडे यांनी महिलांचे डबे व लोकल मर्यादित असून त्यामध्ये गर्दी होत असल्याचे सांगितले. त्यामुळे या आवाहनाला कितपत प्रतिसाद मिळेल, अशी शंका त्यांनी उपस्थित के ली. सध्या रेल्वेकडून प्रवाशांना प्रवेश देणाऱ्या तपासणीत सुसूत्रता नसून अनेक प्रवासी प्रवास करू लागले आहेत. याकडेही रेल्वेने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.