लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : दिवाळी सणात मुखपट्टी, सुरक्षित अंतर इत्यादी नियमांचा उडालेला बोजवारा, गर्दीने ओसांडलेल्या बाजारपेठा आणि सर्वत्र खुला वावर यामुळे पुन्हा शहरातील करोनाबाधितांच्या संख्येत गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत जवळपास ३६ टक्कय़ांनी वाढ झाल्याचे नोंदले आहे.

ऑक्टोबरच्या सुरुवातीच्या आठवडय़ांमध्ये दर आठवडय़ाला नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या १४ हजार होती. महिन्याच्या अखेरीस हा आलेख उताराला लागला. शेवटच्या आठवडय़ात यात मोठी घट नोंदली असून साडेसहा हजार करोनाबाधित आढळले होते.  करोना आता संपुष्टात आला, अशीच चर्चा सर्वत्र सुरू झाली आणि मुखपट्टीचा वापर, सुरक्षित अंतर नियमांच्या पालनाकडे काणाडोळा केला गेला. यातच आलेल्या दिवाळी सणामुळे रहिवाशांचा बाजारपेठेतील वावर वाढला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था खुल्या झाल्याने शहरात बाहेरून येणाऱ्यांची ये-जा वाढली. परिणामी शहरातील रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा वर गेला आहे.

दिवाळीच्या आठवडय़ात नव्याने निदान होणाऱ्या करोनाबाधितांची संख्या साडेचार हजारांपर्यंत घसरली होती. त्यानंतरच्या आठवडय़ात यात थोडी वाढ झाली. तर  शेवटच्या आठवडय़ात रुग्णांच्या संख्येने सात हजारांचा आकडा पार केला आहे.

शहरात सध्या सर्वाधिक रुग्ण बोरिवली (आर मध्य), कांदिवली (आर दक्षिण), भांडुप (एस), मुलुंड (टी),  ग्रॅण्ट रोड (डी),अंधेरी (के पश्चिम) या विभागांत आहेत.

दिवाळीनंतर निश्चितच रुग्णवाढ झाली आहे. सप्टेंबरमध्ये गणेशोत्सवानिमित्त झालेल्या गर्दीनंतर पंधरा दिवसांत ज्या झपाटय़ाने रुग्णवाढ झाली होती, त्या तुलनेत ही वाढ कमी झाली आहे. या आठवडय़ात ती सात ते आठ हजारांवर पोहोचण्याची शक्यता आहे. परंतु आता ती कशी वाढत जाईल हे पुढील पंधरा दिवसांत स्पष्ट होईल. तेव्हा सावधता बाळगण्याची गरज आहे.
– डॉ. अविनाश सुपे, मृत्यू लेखापरीक्षण विभागाचे प्रमुख