देशात करोना व्हायरसचे आतापर्यंत १३८ रुग्ण सापडले आहेत. गेल्या २४ तासांत २३ नवे रुग्ण सापडले आहेत. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत मंगळवारी दुबईहून परतलेल्या ६४ वर्षीय वृद्ध नागरिकाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीने त्याच टॅक्सीमधून प्रवास केला होता जिच्यामुळे पाच जणांना करोनाची लागण झाली आहे. देशात सर्वात जास्त करोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात करोना रुग्णांची संख्या ४२ वर पोहोचली आहे.
१ मार्च रोजी पुण्यात स्थायिक असणारे पती-पत्नी आणि मुलगी दुबईहून मुंबईत परतले होते. आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन त्यांनी पुण्यासाठी टॅक्सी बूक केली होती. पती-पत्नी आणि मुलगी यांना नंतर करोना व्हायरसची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं होतं. यानंतर त्याच टॅक्सीत प्रवास करणाऱ्या अन्य दोन लोकांनी आणि चालकालाही करोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं. अशा पद्धतीने एकाच टॅक्सीतून प्रवास केल्याने पाच जणांना करोनाची लागण झाली आहे.
आणखी वाचा- पुण्यात आणखी एकाला करोनाची लागण
मुंबईत एकाचा मृत्यू
मुंबईत राहणारी ६४ वर्षीय व्यक्ती त्याच टॅक्सीने प्रवास करत विमातळावरुन घऱी पोहोचली होती. दुबईहून प्रवास करून ते परतले होते. मंगळवारी सकाळी कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. थेट संपर्कात आल्यामुळे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाची पत्नी आणि मुलगा यांनाही करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचेही डॉ. शाह यांनी सांगितले.
दुबईहून ५ मार्चला हा रुग्ण देशात परतला होता. ७ मार्चला त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. हृदयविकार असल्याने कुटुंबीयांनी त्यांना माहीमच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी नेले. ८ मार्चला हिंदुजामध्ये दाखल केले. तपासण्यांमध्ये श्वास घेण्याचा त्रास हा विषाणू संसर्गामुळे होत असल्याचा संशय आल्याने त्यांचे नमुने १२ मार्चला कस्तुरबामध्ये पाठवण्यात आले. चाचण्यांमध्ये करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना १३ मार्चला कस्तुरबामध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले.
आणखी वाचा- Coronavirus : मुंबईत मृताची पत्नी, मुलालाही करोनाची लागण
कस्तुरबामध्ये रुग्णाला कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवले होते. त्यांची प्रकृती सुधारत असल्याने अधूनमधून कृत्रिम श्वसनयंत्रणा काढण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यांना उच्चरक्तदाबासह हृदयविकारही होता. तसेच न्यूमोनिया आणि हृदयाला संसर्ग झाला होता. हृदयाला सूज आल्याने आणि ठोके वाढल्याने सोमवारी संध्याकाळी प्रकृती गंभीर होत गेली. मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पालिकेच्या उपकार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 18, 2020 10:06 am