News Flash

उद्योग क्षेत्राने नियोजन करावे!

गेल्या वर्षभरात जगातील इतर देशांनी करोनाच्या काही लाटा अनुभवल्या आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. (संग्रहित छायाचित्र)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबई : करोनामुळे उद्योग-व्यवसायांचे नुकसान होऊ नये व अर्थचक्राला झळ बसू नये अशीच राज्य सरकारची भावना आहे. करोनाची ही दुसरी लाट पाहता तिसरी लाट आली तरी उद्योग-व्यवसाय बंद करावे लागू नयेत व अर्थचक्र  सुरू राहावे यासाठी उद्योजकांनी आतापासूनच करोनाशी सुसंगत अशा कार्यपद्धतीचे नियोजन करावे, सुविधा उभाराव्यात, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच आरोग्यविषयक कृती गटाच्या धर्तीवर उद्योगांसाठी एक कृती गट तातडीने स्थापन करण्याचा निर्णयही ठाकरे यांनी घेतला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे फिक्की, सीआयआय तसेच इतर उद्योग प्रतिनिधींशी संवाद साधून करोनाकाळात विविध उपाययोजना करण्यासाठी सहकार्याचे आवाहन केले. या बैठकीस उदय कोटक, निरंजन हिरानंदानी, दीपक मुखी, हर्ष गोएंका, सलील पारेख, नील रहेजा, अनंत गोएंका, संजीव बजाज, बाबा कल्याणी, बी. त्यागराजन, अनंत सिंघानिया, बनमाली अग्रवाल, अश्विन यार्दी, एस. एन. सुब्रमनियन, सुनील माथुर, संजीव सिंग, नौशाद फोर्बस, सुलज्जा फिरोदिया, समीर सोमय्या, आशीष अग्रवाल आदी उद्योगपती सहभागी होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन यांनी राज्याची बाजू मांडली.

गेल्या वर्षभरात जगातील इतर देशांनी करोनाच्या काही लाटा अनुभवल्या आहेत. त्यांनी वेळोवेळी निर्बंधही लावले आहेत ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यावी. पुढेदेखील टाळेबंदी वा निर्बंधांमुळे उद्योगांना झळ सोसावी लागू नये अशी काळजी आपण घेतली पाहिजे. सर्व उद्योगपती हे राज्याच्या परिवारातले आहेत. करोनाच्या किती लाटा येतील ते आज सांगू शकत नाही, मात्र आता राज्यातील उद्योगांनीही येणाऱ्या लाटेला तोंड देण्याच्या दृष्टीने आवश्यक ते नियोजन आतापासूनच करावे. करोनासुसंगत कार्यप्रणाली स्वीकारणे, चाचणी व लसीकरणाच्या सुविधा उभारणे, कामगार व कर्मचारी यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष यंत्रणा निर्माण करणे, आपल्या परिसरात विलगीकरण व्यवस्था उभारणे तसेच रुग्णशय्या उपलब्ध ठेवणे, घरातून काम करण्याची यंत्रणा विकसित करणे, कामगारांच्या कामाच्या वेळांत तसे अनुरूप बदल करावेत, अशी सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी के ली.

राज्य सरकार या काळात गरीब व दुर्बल घटकांसाठी मदतीचा हात देत आहे. शिवभोजन थाळी ही अनेक गरिबांचे पोट भरते. आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून असे काही उपक्रम आपल्या उद्योगांच्या परिसरातील वसाहती व गावांसाठी राबावावे, असे आवाहनही त्यांनी के ले.

आरोग्य कृती गटाचे डॉ. शशांक जोशी यांनी संसर्गाच्या वाढत्या प्रभावाविषयी माहिती दिली. आपण दररोज सुमारे ३ लाख चाचण्या करीत आहोत. उद्योगांनी त्यांच्या आवारात नवीन तंत्रज्ञानावर आधारित हवेतील प्राणवायू शोषून त्याचे उत्पादन करणारे छोटे प्रकल्प सुरू करावेत तसेच उत्पादित प्राणवायू पूर्णपणे वैद्यकीय कारणासाठी द्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी के ले.

औद्योगिक वसाहतींमध्ये करोनाविषयक सुविधा उभारण्यात येत आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. उद्योगांची लसीकरण केंद्रे ही वैद्यकीय जागेत नसल्याने तातडीने परवानगी देण्याची कार्यवाही औद्योगिक विकास मंडळ करेल, असेही देसाई म्हणाले. तसेच गृहनिर्माण क्षेत्रातील उद्योगांनी त्यांचे पूर्ण झालेले गृहनिर्माण प्रकल्प विलगीकरण केंद्रांसाठी द्यावेत, असे आवाहनही देसाई यांनी केले, तर सीआयआय आणि फिकीच्या समन्वयाने औद्योगिक वसाहतींमध्ये ९३ चाचणी केंद्रे तसेच कामाच्या ठिकाणी २५३ लसीकरण केंद्रे उभारण्यात येत असल्याची माहिती उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंह यांनी दिली. उद्योगांनी प्राणवायूची उपलब्धता तातडीने करून देण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी उद्योजकांचे आभार मानले.

प्राणवायू उपलब्धता, चाचणी व लसीकरण केंद्रांसाठी सरकारला संपूर्ण सहकार्य – उद्योगांची ग्वाही

कोविडचा झपाट्याने वाढता प्रादुर्भाव पाहता सध्याच्या परिस्थितीत प्राणवायूची नितांत गरज आहे. याशिवाय औषधे, रुग्णशय्या सुविधा वाढविणे, चाचणी केंद्रे, लसीकरणाला वेग देणे अशी शक्य ती सर्व मदत राज्य सरकारला करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योगांना केले. त्यावर त्यावर कोविडविरुद्धच्या लढाईत संपूर्ण उद्योगविश्व आपल्यासोबत असल्याची ग्वाही उद्योजकांच्या प्रतिनिधींनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2021 12:46 am

Web Title: coronavirus third wave chief minister uddhav balasaheb thackeray akp 94
Next Stories
1 कुंभमेळ्याहून परतणाऱ्यांना शोधण्याचे आव्हान
2 रुग्णालयीन कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द
3 दारूची तलब आल्याने करोनाबाधिताने रूग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून मारली उडी
Just Now!
X