News Flash

Coronavirus: मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्राच्या जनतेला हाक; “भोंगा वाजला आहे, करोनाविरुद्ध युद्ध सुरु झालंय”

करोनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला संबोधित केलं

करोनाचे संकट हे व्हायरसविरुद्धचे युद्ध आहे. तुम्ही सहकार्य करावे ही माझी अपेक्षा आहे. तुम्ही घर सोडू नका. बाहेर जाऊ नका, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलं आहे. करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकार काय काळजी घेत आहे यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले. यावेळेस बोलताना त्यांनी हे एक प्रकारचे युद्ध असून तुम्ही सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे असं म्हटलं आहे.

राज्यामधील करोनाग्रस्तांची संख्या ४५ हून अधिक झाली आहे. यामुळे राज्य सरकारने मागील काही दिवसांमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. मात्र रुग्णांची संख्या वाढत असल्याचे जनतेमध्ये भितीचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्र्यांनी जनतेला संबोधित केलं. यावेळेस बोलताना उद्धव यांनी महाराष्ट्रातील जनतेला घाबरुन जाण्याचं कारण नसल्याचं सांगितलं आहे. “कोरोनासाठी आपली यंत्रणा सज्ज आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या साठा देखील आहे. घाबरून जाऊ नका,” असं उद्धव यांनी जनतेला सांगितलं आहे.

आणखी वाचा- कृपा करा गर्दी कमी करा; सगळं बंद करण्याची वेळ आणू नका : मुख्यमंत्री

जनतेला संबोधित करताना त्यांनी १९७१ च्या युद्धांची आठवण करुन दिली. “हा युद्धासारखा प्रसंग आहे. मला आठवतयं १९७१ च्या युद्धाच्या काळामध्ये भोंगे वाजले की घरातील प्रकाश बाहेर जाऊ नये म्हणून खिडक्यांवर जाड कागद लावले जायचे. सध्या असलेली परिस्थिती हे सुद्धा व्हायरसविरुद्ध युद्धच आहे. भोंगा वाजला आहे आपण सावध आणि सतर्क राहिलं पाहिजे. सरकार आवश्यक ते सर्व निर्णय घेत आहेत. तुम्ही सहकार्य करावे ही माझी अपेक्षा आहे. तुम्ही घर सोडू नका. बाहेर जाऊ नका. तुमच्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस हे त्यांचं घर सोडून काम करत आहेत. संपूर्ण सरकारी यंत्रण करोनाचा प्रादूर्भाव थांबवण्यासाठी सज्ज झाली आहे. तुम्हीही सहकार्य करा,” असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.

“ज्या सूचना सरकारने दिल्या आहेत त्या पाळा, अशी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे,” असंही उद्धव यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.  हे संकट जात पात धर्म पलीकडे आहे. त्यामुळेच या संकटाशी आपण एकजुटीने लढूयात अशी विनंती मी सर्व धर्मियांना करत असल्याचेही उद्धव म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 12:56 pm

Web Title: coronavirus this is war against virus cm uddhav thackeray appeal to people of state in marharashtra scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 कृपा करा गर्दी कमी करा; सगळं बंद करण्याची वेळ आणू नका : मुख्यमंत्री
2 Coronavirus: “काळजी करु नका”, सिंगापूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी उद्धव ठाकरे सरसावले
3 CoronaVirus : ‘तुम्ही स्वत:ला आणि तुमच्या प्रियजनांना संकटात टाकू नका’
Just Now!
X